प्रकल्पाच्या सुरुवातीपासूनच संजय राऊत यांचा सहभाग, चार्जशीट दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2022 07:38 AM2022-09-20T07:38:33+5:302022-09-20T07:39:14+5:30
ईडीचा दोषारोपपत्रात दावा : पत्राचाळ पुनर्विकास गैरव्यवहार
लाेकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गोरेगाव पत्राचाळ पुनर्विकास आर्थिक घोटाळ्यातून केवळ तीन कोटी रुपयांची कमाई केली नाही, तर ते पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या अंमलबजावणीच्या संकल्पनेच्या संपूर्ण प्रक्रियेतही सहभागी होते, असा दावा सक्तवसुली संचालनालयाने दोषारोपपत्रात केला आहे. सोमवारी हे दोषारोपत्र सादर करण्यात आले.
१२ ऑगस्ट २००६ रोजी तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्र्यांना गोरेगाव येथील सिद्धार्थ नगर येथील पत्राचाळीच्या पुनर्विकासाबद्दल चर्चा करायची होती. ही चर्चा यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये होती. बैठकीत संजय राऊत व त्यांचे सहकारीही उपस्थित होते. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी ३ ऑक्टोबर २००७ रोजी यासंदर्भात घेतलेल्या बैठकीत राऊत उपस्थित होते, असे दोषारोपपत्रात म्हटले आहे.
त्यानंतर गुरू आशिष कन्स्ट्रक्शन प्रा. लि. द्वारे राकेश वाधवान याला पत्राचाळीचा पुनर्विकास करण्यासाठी समोर करण्यात आले. नियंत्रण ठेवण्यासाठी संजय राऊत यांनी त्यांचा प्राक्सी व विश्वासू प्रवीण राऊत याचा गुरू आशिषमध्ये संचालक म्हणून समावेश केला. पत्राचाळीचा पुनर्विकास करण्याचे काम गुरू आशिषकडे सोपविण्यात आले होते. घडलेल्या गुन्ह्यातून संजय राऊत यांना गुरू आशिष कंपनीकडून ३.२८ कोटी रुपयांचा लाभ झाला. एका तिसऱ्या कंपनीला बेकायदा एफएसआय विकून गुरू आशिष कंपनीने नफा कमावला होता. संजय राऊत यांनी प्रवीण राऊत, राकेश वाधवान आणि सारंग वाधवान यांच्याकडून मोठी रक्कम मिळाली आणि ही रक्कम अन्य संपत्ती खरेदी करण्यासाठी वापरण्यात आली, असे ईडीने दोषारोपपत्रात म्हटले आहे. कमावलेली रक्कम मूळ कंपनी एचडीआयएल व उपकंपनीकडे व्यावसायिक हेतूसाठी ट्रान्सफर केली. प्रवीण राऊत यांच्या बँक खात्यात ११२ कोटी रुपये एचडीआयएलकडून जमा करण्यात आल्याचे बँक खात्यावरून स्पष्ट होते. तीच रक्कम मालमत्ता खरेदी करण्यासाठी कंपनीच्या खात्यात व नातेवाइकांच्या खात्यात जमा केल्याचे उघडकीस आले. संजय राऊत या गुन्ह्याद्वारे उत्पन्न निर्माण करण्याच्या व मालमत्ता संपादन करण्याच्या प्रक्रियेत सहभागी होते, असेही दोषारोपपत्रात नमूद आहे.
गुन्ह्यातून कमावलेले १,०३९.७९ कोटी रुपये ठरविलेल्या हेतूसाठी करण्यात आले नाही. एचडीआयएलसह तिच्या समूह कंपन्यांच्या अनेक बँक खात्यांतून रक्कम फिरवत अखेरीस रक्कम हडप करण्यात आली. अलिवाग येथील किहीम येथे जमीन संपादन करण्यासाठी संजय राऊत यांनी काही रक्कम खर्च केल्याचे स्पष्ट झाल्याचे दोषारोपपत्रात नमूद आहे.