Sanjay Raut: संजय राऊतांचा जामीन रद्द होणार? ईडीच्या याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2022 07:53 AM2022-11-25T07:53:53+5:302022-11-25T07:55:05+5:30
पत्राचाळ घोटाळाप्रकरणी खासदार संजय राऊत यांना दिलेला जामीन रद्द करण्यासाठी सक्तवसुली संचालनालयानं (ईडी) मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
मुंबई-
पत्राचाळ घोटाळाप्रकरणी खासदार संजय राऊत यांना दिलेला जामीन रद्द करण्यासाठी सक्तवसुली संचालनालयानं (ईडी) मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. संजय राऊत यांचा जामीन रद्द करण्यासाठी ईडी पूर्ण प्रयत्न करणार आहे. राऊत यांच्याविरोधात पुरावे असूनही सत्र न्यायालयानं त्यांना जामीन दिल्याचं सांगत ईडीनं उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आता उच्च न्यायालय नेमका काय निकाल देतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
संजय राऊत यांची पत्राचाळ घोटाळाप्रकरणी अटक थेट बेकायदेशीर ठरवत पीएमएलए कोर्टानं ईडीला धक्का दिला होता. यामुळे ईडीच्या तपासावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. ९ नोव्हेंबर २०२२ रोजी संजय राऊत यांना जामीन मंजूर झाला होता आणि संजय राऊत १०० दिवसांनी तुरुंगाबाहेर आले.
संजय राऊत यांच्या जामीन प्रकरणावर सुनावणी घेताना विशेष सत्र न्यायालयाने ईडीला झापलं होतं. पत्राचाळ प्रकरणी दोन्ही आरोपींना बेकायदेशीररीत्या अटक करण्यात आली आहे. दिवाणी खटले हे मनी लॉन्डरिंग किंवा आर्थिक गुन्हे अशा नावाखाली आणून निर्दोष लोकांना त्यात ओढून त्यांना अटक करून अशा परिस्थितीत आणणं हे न्यायालय मान्य करू शकत नाही, असं कोर्टाने आपल्या आदेशात म्हटलं होतं.