मुंबई-भारतीय जनता पक्षाचे रत्नागिरी जिल्हा माजी उपाध्यक्ष शशिकांत मोरे यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला.शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांच्या भांडूप (पूर्व) येथील मैत्री बंगल्यात त्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.यावेळी संजय राऊत यांनी त्यांचे शिवसेनेत स्वागत केले. यावेळी आमदार सुनिल राऊत, मुंबई बँकेचे संचालक तसेच मुंबई जिल्हा उपनगर को-ऑपरेटिव हाऊसिंग फेडरेशन लिमिटेडचे अध्यक्ष अभिषेक घोसाळकर उपस्थित होते.
त्यांच्या प्रवेशामुळे रत्नागिरी जिल्ह्यात भाजपाला खिंडार पडले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या आश्वासनावर त्यांनी भाजपात प्रवेश केला होता. परंतू दिवसेंदिवस वाढत जाणारी महागाई, पेट्रोल- डिझे- गॅस सिलिंडरचे वाढते भाव हे पाहून जनतेचा आता भ्रमनिरास झाला आहे. तसेच विरोधकांचे नामोहरम करण्यासाठी ईडी व सीबीआय या यंत्रणेचा गरवापर देखील केला जात असल्याचा आरोप मोरे यांनी केला आहे. त्यामुळे आता केवळ शिवसेनाच सर्वसामान्य नागरिकांना न्याय देईल असा विश्वास मोरे यांनी व्यक्त केला आहे.
मोरे हे मुंबई जिल्हा उपनगर को-ऑपरेटिव हाऊसिंग फेडरेशनचे माजी अध्यक्ष तसेच विद्यमान संचालकपदी कार्यरत आहेत. भारतीय जनता पक्षात काम करत असताना रत्नागिरीचे माजी आमदार बाळासाहेब माने यांच्या जनसंपर्क अधिकारी पदाचा कार्यभार त्यांनी यापूर्वी सांभाळला होता. मोरे यांनी गेली ४० वर्षे मराठी व्यवसायिक रंगभूमीवर नाट्य लेखक म्हणूनही काम केले आहे.