Join us  

Sanjay Raut: 'त्या' दोन खासदारांबद्दल मला माहिती नाही, बैठकीनंतर राऊतांनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2022 8:57 PM

एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे आणि काही दिवसांपूर्वीच शिवसेनेच्या लोकसभेतील प्रतोद पदावरुन हटविण्यात आलेल्या खासदार भावना गवळी यांच्याबद्दल आपणास माहिती नाही

मुंबई - राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची उघड भूमिका शिवसेनेच्या काही खासदारांनी मांडली होती. त्यानंतर आज मातोश्रीवर झालेल्या बैठकीत शिवसेनेच्या अनेक खासदारांनी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची मागणी केली असल्याचं सांगण्यात येत आहे. यातच संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना महत्वाचं विधान केलं आहे. जो शिवसेना पक्षप्रमुखांचं निर्णय असतो, त्यासोबत मी असतो असे राऊत यांनी म्हटले. तसेच, अनुपस्थिती खासदारांबद्दल माहिती देताना मला 2 खासदारांची माहिती नाही, असे त्यांनी स्पष्टच सांगितले.  

"शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेच्या खासदारांची आज मातोश्रीवर बैठक झाली. या बैठकीत नक्कीच राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत चर्चा झाली. यशवंत सिन्हा आणि द्रौपदी मुर्मू या उमेदवारांबद्दल बैठकीत चर्चा झाली. शिवसेनेनं याआधीही पक्षीय अभिनिवेश बाजूला सारुन राष्ट्रपतीपदासाठी योग्य उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. बैठकीत खासदारांनी आपल्या भावना मांडल्या आहेत. त्यानंतर निर्णय घेण्याचे सर्वाधिकार खासदारांनी पक्ष प्रमुखांना दिले आहेत. उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील तो सर्वांना मान्य असेल", असं संजय राऊत म्हणाले. तर, गैरहजर राहिलेल्या खासदारांची माहिती देताना, काहींना व्यक्तिगत अडचणीमुळे येता आले नाही, असं ते म्हणाले. तर, दोन खासदारांबद्दल मला माहिती नाही, असेही ते म्हणाले. 

एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे आणि काही दिवसांपूर्वीच शिवसेनेच्या लोकसभेतील प्रतोद पदावरुन हटविण्यात आलेल्या खासदार भावना गवळी यांच्याबद्दल आपणास माहिती नाही, असे स्पष्टच राऊत यांनी सांगितले. त्यामुळे, या दोन खासदारांच्या भूमिकेबद्दल प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यात, श्रीकांत शिंदे हे निश्चितच शिंदेगटात आहेत.   

दरम्यान, संसदेतील शिवसेनेच्या २२ खासदारांपैकी केवळ १५ खासदार आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीला उपस्थितीत आहेत. त्यामध्ये राज्यसभेतील संजय राऊत आणि प्रियंका चतुर्वेदी या खासदारांचा समावेश आहे. तर लोकसभेतील १९ पैकी अरविंद सावंत, गजानन कीर्तीकर, विनायक राऊत, श्रीरंग बारणे, धैर्यशील माने, हेमंत गोडसे, राहुल शेवाळे, प्रतापराव देशमुख, सदाशिव लोखंडे, राजन विचारे, राजेंद्र गावित, ओमराजे निंबाळकर आदी १२ खासदार उपस्थित होते.

या खासदारांची अनुपस्थिती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे, भावना गवळी यांच्यासह संजय जाधव, संजय मंडलिक, हेमंत पाटील, कृपाल तुमाने आणि कलाबेन डेलकर हे खासदार या बैठकीला अनुपस्थित आहेत. तर राज्यसभेतील शिवसेनेचे खासदार अनिल देसाई हे दिल्लीत असल्याने बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत. खासदारांच्या दबावानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.   

टॅग्स :संजय राऊतशिवसेनाउद्धव ठाकरेखासदार