मुंबई - शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री बनले तर देवेंद्र फडणवीस यांनी अनपेक्षितपणे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर, आता 12 शिवसेना खासदारांचाही गट एकनाथ शिंदे गटात सहभागी झाला आहे. त्यानंतर, या खासदारांचे गटनेते असलेल्या राहुल शेवाळे यांनीही संजय राऊत यांना लक्ष्य केलं. आमदार, खासदार, मंत्री आणि भाजप नेतेही संजय राऊतांवरच टिका करत आहेत. त्यामुळे, आता संजय राऊत यांनीच एका वाक्यातून भावनिक विचार व्यक्त केला आहे.
शिवसेनेतील बंडाच्या या राजकीय घडामोडीत खासदार संजय राऊत हे केंद्रस्थानी आहेत. शिवसेना खासदारांनी संजय राऊत यांच्यामुळेच युतीची चर्चा फिस्कटल्याचे सांगितले. तसेच, युतीसंदर्भात मौठा गौप्यस्फोटही केला होता. तर, आमदारांनीही संजय राऊत यांच्या वक्तव्यावरुन शिवसेनेतील दूरी वाढतच गेल्याचे म्हटले होते. आता, भाजप नेतेही संजय राऊत यांनाच दोष देत आहेत. रावसाहेब दानवे यांनीही संजय राऊतांमुळेच युती तुटल्याचं म्हटलं. त्यामुळे, संजय राऊतांवर चोहोबाजूने टिका होत आहे. तर, शिवसेना पक्षही संकटात आला आहे. दरम्यान, संजय राऊत यांनी सद्यपरिस्थितीला धरुन एक ट्विट केलं आहे. त्यामध्ये, त्यांनी भावनिक विचार व्यक्त केला आहे.
वेळ वाईट आल्यावर लोकं हात न धरता केवळ चुका शोधतात, असं ट्विट राऊत यांनी हिंदीत केलं आहे. 'जब वक्त बुरा चल रहा हो तो लोग..हाथ नही गलतीयां पकडते हैं', असे ट्विट राऊत यांनी केलं आहे. राऊतांच्या या ट्विटला भाजप नेते मोहित कंबोज यांनी रिप्लाय दिला आहे. जसं पेराल तसंच उगवंत, असे ट्विट कंबोज यांनी केले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संजय राऊतांबद्दल प्रश्न विचारला असता, संजय राऊतांच्या आरोपांची दखल काय घ्यायची, असा टोला त्यांनी लगावला. दूसरं कोणी असतं तर आम्ही दखल घेतली असती. संजय राऊतांच्या आरोपावर आम्हाला बोलण्याची गरज नाही, असं एकनाथ शिंदे म्हणाले. तसेच संजय राऊतांचा मॅटिनी शो बंद झाला, असा टोला देखील एकनाथ शिंदे यांनी यावेळी लगावला होता.
उदयनराजे काय म्हणाले
खासदार उदयनराजे भोसले यांना संजय राऊतांसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. त्यावर, एकाच वाक्यात त्यांनी विषय मिटवला. संजय राऊत यांच्यावर बोलणे त्यांनी टाळले. संजय राऊत हे देव आहेत, त्यांच्याबद्दल मला प्रश्न विचारू नका. माझा दिवस चांगला जाऊ द्या, असे म्हणत उदयनराजेंनी संजय राऊतांवर अप्रत्यक्षपणे उपहासात्मक टिका केली