मुंबई - मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढी पाडव्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला. तसंच अनेक मुद्द्यांवर त्यांनी आपलं परखड मतही मांडलं. यानंतर अनेकांनी राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनीही राज यांच्या भाषणानंतर मनसेला टोला लगावला. राऊत यांच्या या विधानावर मनसेनं पलटवार केला आहे.
राज ठाकरे यांच्या मेळाव्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपाचे नेते प्रविण दरेकर यांच्यापासून मोहित कंबोज यांच्यापर्यंत भाजपच्या सर्वच राजकीय नेत्यांनी राज ठाकरेंच्या भाषणाचं समर्थन केलं. प्रविण दरेकर यांनीदेखील राज ठाकरे यांचं भाषण हे सर्वस्पर्शी आणि भविष्याचा वेध घेणारं होतं असं म्हटलं होतं. तर, शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी राज यांच्या विधानाचा समाचार घेत मशिदीच्या आणि तुमच्या भोंग्याचं काय करायचे ते सरकार बघेल. नुसती टीका करून काय होणार? अशानं हाती असलेलं देखील गमवाल, अशी टीका केली होती. तसेच, राज यांनी भाजपचा भोंगा वाजवल्याचंही ते म्हणाले. त्यावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पलटवार केला आहे.
''संजय राऊतांचा भोंगा दररोज सकाळी टीव्ही चॅनेल्सवर वाजलेला असतो. त्यामुळे, त्यांच्या भोंग्याला काय महत्त्व द्यायचं. शरद पवारांचा भोंगा वाजवणाऱ्यांना दुसऱ्यांकडेही तेच दिसणार. संजय राऊत यांचा पवारांच्या नावाने भ्वॉ करुन दररोज भोंगा वाजतो. त्यामुळे, त्यांची विचारसरणी ती झालेली आहे, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंची विचारसरणी शिवसेनेकडे आता उरली नाही. म्हणून, राऊतांना जिथं तिथं भोंगेच दिसत आहेत,'' असा पलटवार मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी संजय राऊतांवर केला आहे.
राज-गडकरी भेटीवर संदीप देशपांडे म्हणतात
संदीप देशपांडे ट्विटरद्वरुन म्हणाले, एक तर गोष्ट स्पष्ट आहे की, भाजप मनसे युतीचा सध्या कुठलाही प्रस्ताव नाही. भविष्यात काय होईल माहीत नाही. पण मनात प्रश्न येतो शिवसेना, राष्ट्रवादी यांनी लोकसाक्षीने व्याभिचार केला, तरी यांना प्रश्न विचारायचे नाहीत आणि आमच्या अफवा उठल्या तरी यांना मिरच्या झोंबतात हे फारच झालं, असं संदीप देशपांडे यांनी सांगितलं.