Join us  

संजय राऊतांच्या अडचणी आणखी वाढणार! ‘ते’ प्रकरण भोवणार? पोलिसांकडून गंभीर दखल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2022 3:41 PM

या प्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घ्यावी आणि संजय राऊतांवर कारवाई व्हावी, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली होती.

मुंबई: मुंबईतील १ हजार ०३४ कोटींच्या पत्राचाळ पुनर्विकासात झालेल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) सध्याच्या घडीला न्यायालयीन कोठडीत आर्थर रोड तुरुंगात मुक्कामी आहेत. यातच संजय राऊत यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची चिन्हे असल्याचे सांगितले जात आहे. महिलेला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ आणी धमकी प्रकरणात संजय राऊत आता पुन्हा एकदा गोत्यात येऊ शकतात, असे सांगितले जात आहे. 

सोशल मीडियावर मागील महिन्यात फोनवरील संभाषणाची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. या ऑडिओ क्लिपमध्ये एक व्यक्ती महिलेला शिवीगाळ करताना दिसत आहे. या ऑडिओ क्लिपमधला आवाज हा संजय राऊत यांचाच असल्याचा दावा भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी आणि राऊतांवर कारवाई व्हावी, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली होती. त्यानुसार संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संजय राऊत आणि स्वप्ना पाटकर यांच्यातील हा संवाद 

संजय राऊत आणि स्वप्ना पाटकर यांच्यातील हा संवाद असल्याचा दावा करण्यात आला आहे. स्वप्ना पाटकर यांनी संजय राऊत यांच्याविरोधात दाखल प्रकरणात पोलिसांचा तपास सुरू केला आहे. आता स्वप्ना पाटकर यांचा पुन्हा नव्याने जबाब नोंदवला जाणार असल्याचे म्हटले जात आहे. वाकोला पोलीस वरीष्ठ अधिकारी, या प्रकरणी चौकशी करू शकतात. त्यामुळे राऊत यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हे आहेत.

दरम्यान, संजय राऊत यांच्या आवाजाच्या कथित ऑडिओ क्लिपची राज्य सरकारने देखील दखल घेतली आहे. पोलीस विभागाने या घटनेची गंभीरतेने दखल घेण्याचे राज्य सरकारचे आदेश दिले आहे. समाज माध्यमांमध्ये फिरत असलेल्या ऑडिओ क्लिपची राज्य सरकारकडून गंभीर दखल घेतल्याची माहिती देण्यात आली आहे.  

टॅग्स :संजय राऊतपोलिस