संजय राऊतांना १५ दिवस जेल, लगेच जामीनही
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2024 06:02 AM2024-09-27T06:02:18+5:302024-09-27T06:02:27+5:30
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा यांच्या मानहानी प्रकरणी दोषी, २५ हजार दंड
मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्यात उद्धवसेनेचे संजय राऊत यांना माझगाव दंडाधिकारी न्यायालयाने गुरुवारी १५ दिवस कारावासाची शिक्षा ठोठावली. मात्र, काही तासांतच त्यांची जामिनावर सुटकाही करण्यात आली. न्यायदंडाधिकारी आरती कुलकर्णी यांनी राऊत यांना भारतीय दंडसंहिता कलम ५०० अंतर्गत बदनामीच्या गुन्ह्यासाठी दोषी ठरविले. त्यासाठी त्यांना २५ हजार रुपये दंडही ठोठावला.
शिक्षा ठोठावण्यात आल्यानंतर राऊत यांच्या वकिलांनी दोन अर्ज दाखल केले. पहिला अर्ज शिक्षेला स्थगितीसाठी व दुसरा जामिनावर सुटका करण्याबाबत होता. न्यायालयाने दोन्ही अर्ज स्वीकारले.
राऊत यांना दोन वर्षे कारवासाची शिक्षा ठोठावण्यात यावी, अशी मागणी सोमय्या यांचे वकील विवेकानंद गुप्ता यांनी केली होती. मात्र, न्यायालयाने त्यांची मागणी मान्य न करता १५ दिवस कारावासाची शिक्षा ठोठावली.
प्रकरण काय? : मीरा-भाईंदर येथील १०० कोटी रुपयांच्या शौचालय घोटाळ्यात मेधा यांचा हात असल्याचा लेख शिवसेनेच्या मुखपत्रात प्रसिद्ध झाला होता. या लेखामुळे आपली बदनामी झाल्याचे नमूद करीत मेधा सोमय्या यांनी २०२२ मध्ये राऊत यांच्याविरोधात माझगाव दंडाधिकारी न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला होता.