तुम्ही उकीरडे फुंकत हिंडलात, भाजपच्या जनआशीर्वीद यात्रेवरही भडकले राऊत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2021 11:52 AM2021-08-18T11:52:24+5:302021-08-18T11:52:41+5:30
कोविडच्या संकाटातून जनतेला बाहेर काढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे प्रयत्न सुरू आहेत. शिक्षण असेल, इन्फ्रास्ट्रक्चर असेल, डेव्हलपमेंट असेल सर्वच बाबतीच सावधगिरीने पावलं टाकून त्यांचं काम सुरू आहे.
मुंबई - शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या टॉप 5 मधील कामगिरीबद्दल अभिमान वाटत असल्याचे म्हटले. त्यावेळी, मुख्यमंत्री घरातून बाहेरच पडले नसल्याची विरोधकांची टीका होत असल्याच्या प्रश्नावर ते चांगलेच भडकले. घरातून बाहेर न पडताच ते टॉप 5 मध्ये आले का? असा सवालही त्यांनी विचारला. तसेच, विरोधी पक्ष कायम टीका करत असून ते उकीरकडे फुंकत हिंडल्याची बोचरी टीकाही राऊत यांनी विरोधकांवर केली.
कोविडच्या संकाटातून जनतेला बाहेर काढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे प्रयत्न सुरू आहेत. शिक्षण असेल, इन्फ्रास्ट्रक्चर असेल, डेव्हलपमेंट असेल सर्वच बाबतीच सावधगिरीने पावलं टाकून त्यांचं काम सुरू आहे. त्यामुळे, देशाचं लक्ष त्यांच्या कामगिरीकडे लागलं आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले. तसेच, विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना, घरी बसून टॉप 5 मध्ये येता येतं का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
कोरोना काळात सर्वांचच काम हे वर्क फ्रॉम होम असं होतं. तुम्ही उकीरडे फुंकत हिंडलात सगळीकडे, असे म्हणत विरोधकांवर जबरी टीकाही केली. तसेच, भाजपा नेते आणि केंद्रीयमंत्र्यांच्या जनआशीर्वीद यात्रेवरही राऊत चांगलेच भडकले. जनआशीर्वीद यात्रा म्हणजे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण आहे. ज्याप्रकारे या गर्दीचं नियंत्रण आहे, लोकांना एकत्र करताय हे तिसऱ्या लाटेचं आमंत्रण आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी इशारा दिल्यानंतरही तुम्ही हे करताय, म्हणजे मुद्दामुनच. मात्र, किमान संयम पाळा, असेही राऊत यांनी म्हटले.
लवकरच पहिल्या क्रमांकाचे मुख्यमंत्री ठरतील
देशातील विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या लोकप्रियतेचा आणि कामगिरीचं सर्वेक्षण इंडिया टुडे या माध्यम समुहाच्या माध्यमातून करण्यात आलं होतं. त्यामध्ये, देशातील टॉप 5 मुख्यमंत्र्यांमध्ये शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जींचा समावेश आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अनेकदा, जेव्हा जेव्हा असं सर्वेक्षण झालंय, तेव्हा टॉप 10 किंवा टॉप 5 मध्ये आले आहेत. काही काळापूर्वी ते टॉप 10 मध्ये होते, पण आज टॉप 5 मध्ये आले आहेत. आपल्या कार्यकुशलतेतून ते हळूहळू देशात पहिल्या क्रमांचे मुख्यमंत्री बनतील, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.