संजय राऊत खिचडी घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार, संजय निरुपम यांचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2024 12:50 PM2024-04-08T12:50:23+5:302024-04-08T12:50:45+5:30
Sanjay Nirupam : सोमवारी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत संजय निरुपम यांनी संजय राऊतांवर गंभीर आरोप करत त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे.
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत खिचडी घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार आहेत. त्यांच्या कुटुंबियांना या प्रकरणात एक कोटीची दलाली मिळाल्याचा गंभीर आरोप काँग्रेसने पक्षातून निलंबित केलेले संजय निरुपम यांनी केला आहे. सोमवारी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत संजय निरुपम यांनी संजय राऊतांवर गंभीर आरोप करत त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे.
राजकारणात कधीही कुटुंबाला खेचू नये. पण घोटाळा ज्याप्रकारे झाला आहे, त्यात त्यांचा उल्लेख करावा लागत आहे. संजय राऊत खिचडी घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार आहेत. पत्राचाळ घोटाळा प्रकरणात पकडले गेल्यानंतर त्यांनी पत्नीच्या नावे लाच घेतल्याचे समोर आले होते. त्यांनी पत्नीला मधे आणायला नको होते. खिचडी घोटाळ्यात त्यांनी मुलगी, भाऊ आणि आपल्या पार्टनरच्या नावे पैसे घेतले आहेत, असा आरोप संजय निरुपम यांनी केला आहे.
याचबरोबर, सह्याद्री रिफ्रेशमेंट कंपनीत राजीव साळुखे, सुजीत पाटकर हे संजय राऊतांचे पार्टनर आहेत. कोविडमध्ये त्या कंपनीला 6 कोटी 37 लाखांची खिचडी पुरवण्याचे कंत्राट मिळाले होते. या कंपनीतून संजय राऊत आणि त्यांच्या कुटुंब, मित्रांनी 1 कोटी रुपये दलाली म्हणून घेतले. बँकेतील खात्यातून मुलीच्या नावे संजय राऊतांनी चेकने लाच घेतली, असेही संजय निरुपम यांनी म्हटले आहे.
पुढे ते म्हणाले की, 29 मे 2020 रोजी 3 लाख 50 हजार रुपये खात्यात आले होते. 26 जून 2020 रोजी 5 लाख रुपये मिळतात. 6 ऑगस्टला 1 लाख 25 हजार, 20 ऑगस्टला 3 लाखांचा एक चेक येतो. याचदरम्यान संजय राऊतांचे सख्खे भाऊ संदीप राऊत यांच्या खात्यावर 6 ऑगस्टला 5 लाखांचा चेक आला, असा दावा संजय निरुपम यांनी केला आहे.
जोगेश्वरीमध्ये एका रेस्टॉरंटने आपले स्वयंपाकघर असल्याचा दावा करून टेंडर काढले गेले. हॉटेल मालकालाही त्याची माहिती नव्हती. या कंपनीत कदम नावाची व्यक्ती नाही, मात्र टेंडर देण्यात आली होती. 6.5 कोटी रुपयांचे कंत्राट घेऊन दुसऱ्या कंपनीला दिले. त्यावेळचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फेसबुक लाईव्ह करायचे, मी गरिबांच्या पाठीशी म्हणत होते, असे संजय निरुपम यांनी म्हटले आहे.
खिचडी प्रकरणाचा तपास ईडी करत आहे. या तपासात स्थानिक उमेदवारासोबतच संजय राऊत यांनाही अटक करण्यात यावी, अशी माझी मागणी आहे. ईडीकडून सुरु असलेल्या तपासाचा विस्तार व्हायला हवा. तसेच, महाविकास आघाडीचा उमेदवारही खिचडी चोर असून ज्यांनी त्यांना उमेदवारी दिली तेही चोर आहेत, असे म्हणत ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्यावरही संजय निरुपम यांनी निशाणा साधला आहे.
दरम्यान, मुंबई मनपात झालेल्या खिचडी घोटाळा प्रकरणात 8 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता. या घोटाळ्यावरून किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्यावर आरोप केले होते. आता काँग्रेसमधून बाहेर पडलेले संजय निरुपम यांनीही संजय राऊत यांच्यावर या प्रकरणात आरोप केले आहेत. या प्रकरणी आतापर्यंत आदित्य ठाकरे यांचे निकटवर्ती सूरज चव्हाण यांना ईडीकडून अटक करण्यात आली असून अमोल कीर्तिकर आणि संजय राऊत यांचे बंधू संदीप राऊत यांची चौकशी झाली आहे.