Sanjay Raut: सुरक्षा सोडून येऊन दाखवा, शिंदेगटाच्या गोगावलेंची संजय राऊतांना थेट धमकी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2022 11:38 AM2022-07-01T11:38:29+5:302022-07-01T11:40:33+5:30
संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर निशाणा साधला आहे.
मुंबई - राज्यातील नाट्यमय घडामोडीनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी सायंकाळी राजभवनवर शपथ घेतली. तर मुख्यमंत्री पदाचे एकमात्र दावेदार मानले जात असलेले विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस नवे उपमुख्यमंत्री झाले. या धक्कातंत्रामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. तर, बाळासाहेबांच्या एका शिवसैनिकाला फडणवीसांनी मुख्यमंत्री केल्याचे उद्गार नवीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काढले. सत्तासंघर्षाच्या या घडामोडींनंतरही शिवसेना नेते खासदार संजय राऊत पुन्हा शिंदेगटावर निशाणा साधत आहेत. आता, शिंदेगटाच्या आमदार पुत्राने राऊत यांना थेट धमकी दिली आहे.
संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर निशाणा साधला आहे. तसेच, एका शिवसैनिकाला मुख्यमंत्री केले असे म्हणणार नाही. जिथे ठाकरे तिथे शिवसेना हे सेनेचे सुत्र आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी मिळून राज्याचा कारभार पुढे न्यावा यासाठी आमच्या शुभेच्छा आहेत, अशा शुभेच्छा त्यांनी नवीन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना दिल्या आहेत. दरम्यान, या घडामोडींमध्ये संजय राऊत आणि शिंदे गट यांच्यातील दुरावा उघड झाला आहे.
शिंदे गटाचे नेते शहाजी पाटील यांनी काल संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. राऊतांसारख्या माणसांमुळे आम्हाला बंडखोर म्हटले जाते, पण आम्ही शिवसैनिकच आहोत, असे ते म्हणाले. त्यानंतर, आता बंडखोर आमदार भरत गोगावले यांच्या पुत्राने संजय राऊत यांना थेट इशारा दिला आहे. मंगळवारी अलिबागमध्ये झालेल्या मेळाव्यात महाडचे बंडखोर आमदार भरत गोगावले यांच्यावर टीका करताना अनंत गीतेंनी ‘महाडच्या भूताला बाटली बंद करण्याची वेळ’ आलीय असं म्हटलं होतं. यावेळी, संजय राऊत हेही आवर्जून उपस्थित होते. त्याच पार्श्वभूमीवर भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांनी थेट संजय राऊत यांचा उल्लेख करत शिवसेनेला इशारा दिला आहे.
Maharashtra | Shiv Sena leader Sanjay Raut said that they'll hold a rally in Mahad, Raigad. I challenge him to come to Mahad without his security personnel, the 'Shivsainiks' (party workers) won't stop short of giving him 'prasad': Shinde Faction Shiv Sena leader Vikas Gogawale pic.twitter.com/Ro0XCxWijB
— ANI (@ANI) June 30, 2022
राऊत यांनी महाड येथे मेळावा घेणार असल्याचे म्हटले होते. आता, मी संजय राऊतांना आव्हान देतो की, त्यांनी सुरक्षेशिवाय महाडमध्ये येऊन दाखवावं. येथील शिवसैनिक त्यांना प्रसाद दिल्याशिवाय राहणार नाहीत, असे म्हणत भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांनी राऊतांना थेट धमकीच दिली आहे.
मेळाव्यात राऊतांनी केली टिका
रायगड जिल्ह्यातील 3 आमदारांच्या बंडखोरीविरुद्ध अलिबाग येथे शिवसेनेचा मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी अलिबाग, पेण, रोहा आणि मुरुड तालुक्यातून या मेळाव्यासाठी शिवसैनिकांना बोलविण्यात आले होते. त्यावेळी राऊतांनी बंडखोर आमदारांवर त्यांच्यास्टाईलने टिका केली. शंभर गोठ्यातील शेण काढून आमदार महेंद्र दळवी शिवसेनेत आले होते. ते गेले, आता बैल बदलायची वेळ आल्याचं राऊत यांनी म्हटलं होतं. तर, अनंत गीते यांनी भरत गोगावलेंना भूत संबोधलं होतं.
फडणवीस मोठ्या मनाचे राजकारणी - शिंदे
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी सायंकाळी राजभवनवर शपथ घेतली. यानंतर एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. यावेळी फडणवीस हे मोठ्या आणि उमद्या मनाचे राजकारणी आहेत. त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. राज्याच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. महाराष्ट्रात एक मजबूत सरकार दिसेल. बाळासाहेबांचे हिंदुत्व, मतदारसंघातील कामे आणि राज्याचा विकास हाच आमचा अजेंडा आहे. मंत्रिपदासाठी किंवा कोणत्याही स्वार्थासाठी आम्ही एकत्र आलो नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.