मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून भाजपावर सतत टीकेचे बाण सोडणारे शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर लिलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उद्या त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे.
संजय राऊत यांच्या छातीत दुखू लागल्याने सोमवारी त्यांना लीलावती रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. त्यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये दोन ब्लॉकेज आढळून आल्यामुळे त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली. अँजिओप्लास्टी झाल्यानंतर त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. मात्र, आज त्यांना अतिदक्षता विभागातून बाहेर आणले असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. तसेच, डॉक्टरांनी त्यांना पुढील दोन दिवस विश्रांती घेण्यास सांगितल्याचे समजते. गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत शिवसेनेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळत होते. कामाचा व्याप वाढल्याने गेल्या काही दिवसांपासून त्यांना त्रास होत होता. त्याकडे त्यांनी सुरुवातीला दुर्लक्ष केले. मात्र, सोमवारी कुटुंबीयांच्या आग्रहाखातर ते उपचारांसाठी रुग्णालयात दाखल झाले.
याचबरोबर, राज्यातील सत्तास्थापनेचा पेच गुंतागुंतीचा बनलेला असताना या सर्व घडामोडीत शिवसेनेची ढाल बनून लढणारे संजय राऊत यांनी लीलावती रुग्णालयात ट्विट करुन पुन्हा एकदा सत्तास्थापनेच्या प्रयत्नात शिवसेना मागे हटली नाही, असा विश्वास निर्माण केला आहे. "लहरों से डर कर नौका पार नहीं होती, कोशीश करने वालों की कभी हार नही होती ।' हम होंगे कामयाब, जरूर होंगे अशा शब्दात संजय राऊतांनी रुग्णालयातून शिवसेनेचा आत्मविश्वास कायम ठेवला आहे.
गेल्या १५ दिवसांपासून संजय राऊत यांनी भाजपावर सतत निशाणा साधला आहे. मुख्यमंत्रिपदावर आक्रमक असलेल्या शिवसेनेची बाजू माध्यमांमध्ये ठामपणे मांडण्याची जबाबदारी संजय राऊत यांच्यावर होती. रोज सकाळी ट्विट आणि पत्रकार परिषदेच्या माध्यमातून संजय राऊत शिवसेनेची बाजू मांडत होते.