Join us

राम मंदिरासाठी संजय राऊत यांनी घेतली राम नाईक यांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2018 1:17 AM

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राम मंदिराच्या उभारणीसाठी अयोध्येत जात असून, त्याच्या तयारीसाठी सेनेचे नेते खा. संजय राऊत व सरचिटणीस मिलिंद नार्वेकर यांनी उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांची भेट घेऊन आयोजनाबद्दल चर्चा केली.

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राम मंदिराच्या उभारणीसाठी अयोध्येत जात असून, त्याच्या तयारीसाठी सेनेचे नेते खा. संजय राऊत व सरचिटणीस मिलिंद नार्वेकर यांनी उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांची भेट घेऊन आयोजनाबद्दल चर्चा केली.मंगळवारी हे दोन्ही नेते मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व पोलिस महासंचालकांची भेट घेतील. तेथून खा. राऊत अयोध्येसाठी रवाना होतील. ‘आधी मंदिर नंतर सरकार’ ही घोषणा शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी दिल्याची माहितीही खा. राऊत व नार्वेकर यांनी राज्यपाल राम नाईक यांना दिली.ठाकरे २४ व २५ नोव्हेंबर रोजी अयोध्येत जाणार आहेत. तेथे ते श्रीरामाचे दर्शन घेतील व शरयु नदीवर पूजा करतील. त्यानंतर अयोध्येपासून पाच किलोमीटरवरील मैदानावर ते लोकांशी संवाद साधतील. त्याठिकाणी व्यासपीठ उभारण्यात येत आहे. खा. राऊत म्हणाले की, बाबरी मशिदीचा ढाचा पाडण्यात आला, त्यावेळी कोणीही त्याची जबाबदारी घेण्यास पुढे आले नव्हते. त्यावेळी जर तो ढाचा शिवसैनिकांनी पाडला असेल तर मला त्याचा अभिमान आहे असे उद्गार बाळासाहेब ठाकरे यांनी काढले होते. शिवसेनेसाठी राम मंदिर हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे ‘आधी मंदिर नंतर सरकार’ अशी आमची स्पष्ट भूमिका आहे.

टॅग्स :संजय राऊत