मुंबई - राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे संजय पवार यांचा पराभव झाल्याने शिवसेना नेते संजय राऊत यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली होती. राऊत यांनी काही अपक्ष आमदारांची नावे जाहीर करत, या आमदारांनी आम्हाला मतदान केलं नसल्याचा आरोप त्यांनी केला. त्यात देवेंद्र भुयार यांचंही नाव घेतलं होतं. त्यामुळे, देवेंद्र भुयार यांनी राग व्यक्त करत अगोदर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर, हॉटेल ग्रँड हयात येथे जाऊन संजय राऊत यांचीही भेट घेतली.
मी माझे काही प्रश्न मुख्यमंत्र्यांसमोर मांडले होते. त्यामुळे काही लोकांना मी शिवसेनेविरोधात आहे, असं वाटलं. त्यातूनच शिवसेनेचा पराभव झाल्यानंतर त्याचं खापर अपक्ष आमदारांवर पर्यायाने माझ्यावर फोडलं गेलं. त्यामुळे मी हा मुद्दा शरद पवार यांच्यासमोर मांडला. त्यानंतर राऊत यांनी गैरसमजामधून हे विधान केलं असावं, असं देवेंद्र भुयार यांनी शरद पवारांच्या भेटीनंतर म्हटलं होतं. त्यानंतर, त्यांनी संजय राऊत यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी गैरसमज दूर झाल्याचे म्हटले.
'आमचे जे काही गैरसमज होते, ते दूर झाले आहे. ज्यावेळी मतदान प्रक्रिया पार पडली. तेव्हा तिथे मी मत दिले नाही, अशी चर्चा रंगली होती. मत देताना थोडी गडबड केली, 10 जणांना थांबायला सांगितले, त्यानंतर दोन जण थांबले असताना मी मतदानाला गेलो. हाच एक गैरसमज होता. मी, मुख्य प्रतोद आणि उपमुख्यमंत्र्यांच्या सुचनेनुसारच मतदान केले,' असे स्पष्टीकरण आपण संजय राऊत यांना दिल्याचे भुयार यांनी सांगितले. तसेच, मतदानावेळी सुरू असेली चर्चा त्यांच्या कानावर पडल्याने त्यांनी तशी प्रतिक्रिया दिली, असेही भुयार यांनी माध्यमांना सांगितलं.
मुख्यमंत्री अपक्षांना भेटत नाहीत
मी महाविकास आघाडीचा घटक आहे आणि राहीन. आगामी विधान परिषद निवडणुकीत याचा परिणाम होणार नाही. आम्हाला मुख्यंमत्री भेटत नाही हे खरेच आहे. शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले की, अपक्ष आमदारांची २० तारखेआधी भेट घ्या. त्यांची समजूत काढा. तसे मुख्यमंत्र्यांनी केले पाहिजे. आम्ही जनतेची कामे सांगतो, वैयक्तिक कामासाठी निधी मागत नाही, असेही भुयार यांनी म्हटले.