Sanjay Raut Mother: मुंबईच्या गोरेगावमधील पत्रा चाळ पुनर्विकास प्रकरणी झालेल्या गैरव्यवहाराप्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीकडून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या भांडुप येथील मैत्री या निवासस्थानी सकाळी ७ वाजताच्या सुमारास ईडीचे ८ ते १० अधिकाऱ्यांचे पथक दाखल झाले. त्यानंतर त्यांच्या घराची तब्बल ९-१० तास झाडाझडती घेण्यात आली आणि अखेर संजय राऊतांना ईडी कार्यालयात नेण्यात आले. संजय राऊत यांनी ईडीने ताब्यात घेतले तेव्हा त्यांच्या मातोश्रींना आणि कुटुंबीयांना अश्रू अनावर झाल्याचे दिसले.
संजय राऊत यांना ईडीने चार वेळा समन्स बजावले होते. त्यांपैकी केवळ एकदाच ते चौकशीसाठी हजर राहिले. त्यानंतर ते चौकशीला गेले नाहीत. त्यामुळे तपासात सहाकार्य करत नसल्याचा ठपका ठेवत ईडीचे अधिकारी आज राऊतांच्या घरी आले. त्यांच्या भांडुप येथील घरी त्यांनी राऊत यांची चौकशी केली, तसेच त्यांची पत्नी वर्षा राऊत यांचीही चौकशी करण्यात आली. पण अखेरीस संजय राऊतांनी ईडीने ताब्यात घेतले आणि ईडी कार्यालयाच्या दिशेने त्यांना घेऊन जाण्यात आले. यावेळी संजय राऊत जेव्हा घरातून खाली उतरले तेव्हा त्यांच्या मातोश्री खिडकीत उभ्या असल्याचे दिसले. आपल्या मुलाला केंद्रीय तपास यंत्रणांनी ताब्यात घेतल्याचे पाहिल्याने त्या माऊलीला अश्रू अनावर झाले. अनेक प्रसारमाध्यमांनी तो भावनिक क्षण कॅमेऱ्यातही टिपला.
दरम्यान, संजय राऊत यांना जवळपास १० तासांच्या चौकशीनंतर घराबाहेर आणण्यात आले आणि पोलीस व सीआरपीएफच्या सुरक्षेमध्ये ईडी कार्यालयाकडे घेऊन गेले. संजय राऊतांना ताब्यात घेत असताना शिवसेनेचे कार्यकर्तेदेखील आक्रमक झाले होते. त्यावेळी कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेण्यात आले. संजय राऊत यांना घरातून बाहेर नेताना त्यांनी सकाळपासून उभे असलेल्या सर्व शिवसैनिकांचे अभिवादन केले. साऱ्यांना हात हलवून आणि भगवा गमछा फिरवून अभिवादन केल्यानंतर ते ईडीसोबत कारमधून रवाना झाले. त्यावेळी संजय राऊतांच्या मातोश्री, त्यांच्या पत्नी वर्षा राऊत आणि त्यांच्या भगिनी सर्व जण घराच्या खिडकीत उभ्या असल्याचे दिसले. यावेळी संजय राऊत यांच्या मातोश्रींच्या डोळ्यात अश्रू दिसत होते. पण काही वेळाने त्यांनी आपल्या भावना आवरल्या आणि आपल्या मुलाच्या पाठीशी उभ्या असलेल्या शिवसैनिकांना अभिवादन केले.