मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या मानहानी दाव्याच्या सुनावणीस अनुपस्थित राहिल्याने दंडाधिकारी न्यायालयाने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले. वॉरंट रद्द करण्यासाठी व मानहानीच्या दाव्याच्या सुनावणीस अनुपस्थित राहण्याची मुभा मिळावी, यासाठी राऊत यांनी तातडीने न्यायालयात धाव घेतली.
सोमय्या यांच्या वकिलांनी राऊत यांच्या अर्जाला विरोध केला. खटल्याच्या सुनावणीस राऊत कधीच उपस्थित राहिले नाहीत, असा आरोप सोमय्यांच्या वकिलांनी केला. सोमय्या यांच्या वकिलांचे म्हणणे मान्य करत राऊत यांचा खटल्याच्या सुनावणीस अनुपस्थित राहण्याचा अर्ज फेटाळत दंडाधिकारींनी राऊत यांच्यावर अजामीनपात्र वॉरंट जारी केले. त्यानंतर राऊत यांच्या वकिलांनी तातडीने राऊत यांना संपर्क साधला. राऊत न्यायालयात हजर राहिले. मात्र, न्यायालयाने त्यांना २४ जानेवारी रोजी पुढील सुनावणीस हजर राहण्यास सांगितले.