Sanjay Raut: जनाब संजय राऊत माझ्यासारखं महाराष्ट्रात फिरून दाखवा, पडळकरांचं थेट चॅलेंज
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2022 10:24 AM2022-03-22T10:24:19+5:302022-03-22T10:26:52+5:30
Sanjay Raut: मोदीजी, पाकव्याप्त काश्मीर पुन्हा हिंदुस्तानाला कधी जोडत आहात, असा रोखठोक सवाल संजय राऊत यांनी केला होता.
मुंबई - शिवसेना आणि भाजपमधील वाद दिवसेंदिवस अधिक तीव्र होत असल्याचे पाहायला मिळत आहे. अलीकडेच एमआयएमच्या इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीला दिलेल्या युतीच्या प्रस्तावानंतर आरोप-प्रत्यारोपांची धार अधिकच वाढत चाललेली दिसत आहे. त्यातच द काश्मीर फाइल्स या चित्रपटावरूनही शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) वर टीका केली. राऊत यांच्या या टीकेवरुन आता भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पलटवार केला आहे.
मोदीजी, पाकव्याप्त काश्मीर पुन्हा हिंदुस्तानाला कधी जोडत आहात, असा रोखठोक सवाल संजय राऊत यांनी केला होता. ''पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकव्याप्त काश्मीर भारतात आणण्याची घोषणा केली होती. तेव्हा आता मोदीजी तुम्ही पाकव्याप्त काश्मीर पुन्हा हिंदुस्तानाला कधी जोडत आहात? जे वीर सावरकर यांचे स्वप्न होते ते पूर्ण झाल्याचे आम्हाला या जन्मात पाहता येईल,'' असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
राऊत यांना प्रत्युत्तर देताना गोपीचंद पडळकर यांनी, ''जनाब राऊत तुमच्या माहिती करिता जेंव्हा लाल चौकात पाक आंतकवाद्यांनी, कोई माँ का लाल तिरंगा लहराके दिखाये, अशा धमक्यांचे पोस्टर्स लावले होते. त्यावेळेस, नरेंद्र मोदींनींच या धमक्यांना न जुमनता लाल चौकात तिरंगा फडकवून दाखवला होता, अशी आठवण सांगितली. तसेच, राज्यात उर्जामंत्र्यांच्या आश्वासनानंतर सुद्धा शेतकऱ्यांची वीज कापली जात आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतोय, यावर कधीतरी एखादा लेख लिहा. जनाब राऊत तुम्ही वाय सुरक्षेबाबत लेख लिहता, पण माझे तुम्हाला खुले आव्हान आहे की, माझ्यासारखी कुठलीही सुरक्षा न स्वीकारता महाराष्ट्रात फिरवून दाखवा, असे चॅलेंजच पडळकर यांनी राऊतांना दिले आहे. तसेच, तेव्हाच शेतकऱ्यांचं तुमच्यावरती किती प्रेम आहे, याची तुम्हाला खरी प्रचिती येईल, असेही ते म्हणाले.
आदित्य ठाकरेंचा फज्जा उडवला
जनाब संजय राऊत तुम्हाला उत्तरप्रेदश व गोवा येथील विधानसभा निवडणुकीत नोटा पेक्षाही कमी मत मिळाली आहेत. त्यामुळे, आदित्य ठाकरेंना देशपातळीवर लाँच करुन तुम्ही त्यांचा पार फज्जा उडविला. कदाचित ज्यापद्धतीने काकांनी राहुल गांधींना टोपन नाव मिळवून दिले, तशीच काही तुमची सुप्त इच्छा आदित्यबाबत दिसतेय, असा टोलाही गोपीचंद पडळकर यांनी खासदार राऊतांना लगावला आहे.