Join us

Sanjay Raut : मुलीच्या लग्नात साडे नऊ कोटी रुपयांचं कारपेट वापरलं, मुनगंटीवारांनी दिलं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2022 7:33 PM

किरीट सोमय्यांचा दलाल असा उल्लेख करत राऊत यांनी सोमय्यांच्या आरोपांवरही खुलासा केला. संजय राऊत यांच्या मुलीच्या लग्नातील खर्चावरुन होत असलेल्या आरोपावर राऊत यांनी पलटवार केला.

मुंबई - राज्यातलं सरकार पाडण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर सुरू आहे. आधी आमच्या नेत्यांना लक्ष्य केलं, नंतर माझ्याकडे वळले. पण यंत्रणांना भीक घातली नाही म्हणून ईडीच्या धाडी सुरू झाल्या. काय बघायचं ते बघून घ्या, आम्हीदेखील बघून घेऊ, अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि केंद्रीय तपास यंत्रणांना लक्ष्य केलं. यावेळी, भाजप नेत्याच्या मुलीच्या लग्नात कारपेट तब्बल साडे नऊ कोटींचं वापरल्याचां गंभीर आरोपही त्यांनी केला. 

किरीट सोमय्यांचा दलाल असा उल्लेख करत राऊत यांनी सोमय्यांच्या आरोपांवरही खुलासा केला. संजय राऊत यांच्या मुलीच्या लग्नातील खर्चावरुन होत असलेल्या आरोपावर राऊत यांनी पलटवार केला. त्यावर, भाजप नेते माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा उल्लेख झाल्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी राऊतांच्या आरोपावर खुलासा केला आहे. 'स्वत:च्या खर्चावर बोट ठेवलं जातं, तेव्हा मनुष्य अशाप्रकारे वागतो. मुलीच्या लग्नाची ही 2 वर्षांपूर्वीची गोष्ट असून त्यांच्या विभागाने चौकशी करुन अहवाल दिला आहे. त्या अहवालात काहीही सिद्ध झालं नाही, असे मुनगंटीवार यांनी म्हटलं. तसेच, सध्याचे मुख्यमंत्रीही त्या सोहळ्याला उपस्थित होते, असा टोलाही मुनगंटीवार यांनी लगावला. 

काय म्हणाले होते संजय राऊत

माझ्या मुलीच्या लग्नात असलेल्या मेहंदीवाल्याकडे ईडीवाले गेले, नेलपॉलिशवाल्याकडे गेले. मी कुठं कपडे शिवले हे विचारत माझ्या मुलुंडमधील टेलरकडेही ईडीवाले गेले होते. कितना पैसा दिया, क्या क्या दिया... अशी विचारणा केली. तुम्ही आमच्या घरात शिरताय, तुम्ही आमच्या मुलांपर्यंत जाताय, दुकानात येताय, असे म्हणत राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. त्यावेळी, एका माजी मंत्र्यांच्या मुलीच्या लग्नाचं उदाहरणही त्यांनी दिलं.  

9.5 कोटींचं कारपेट

भाजपच्या माजी मंत्र्याच्या मुलीच्या लग्नासाठी मुंबईत मोठा सेट उभारला होता. हे मंत्रीमहोदय हे वनमंत्री होते, म्हणून तो सेट फॉरेस्ट टाईपचा उभारला होता. येथे जंगलाचा फिल यावा म्हणून या सेटमध्ये अंथरलेलं कारपेट हे 9.5 कोटी रुपयाचं होतं, अशी माहिती संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली. ईडीला हे दिसलं नाही का? असा सवालही राऊत यांनी विचारलं. संजय राऊत यांचा रोख थेट भाजप नेते सुधीर मुनगुंटीवार यांच्याकडे होता. 

टॅग्स :संजय राऊतशिवसेनासुधीर मुनगंटीवारभाजपालग्न