Sanjay Raut, Shivsena Dasara Melava: "संजय राऊत दसरा मेळाव्याला नसले तरीही..."; बंधू सुनील राऊतांचे रोखठोक मत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2022 06:52 PM2022-10-05T18:52:25+5:302022-10-05T18:52:49+5:30

संजय राऊतांची रिकामी खुर्ची ठरली होती चर्चेचा विषय

Sanjay Raut not present for Shivsena Dasara Melava but he will be surely missed says Uddhav Thackeray Sunil Raut | Sanjay Raut, Shivsena Dasara Melava: "संजय राऊत दसरा मेळाव्याला नसले तरीही..."; बंधू सुनील राऊतांचे रोखठोक मत

Sanjay Raut, Shivsena Dasara Melava: "संजय राऊत दसरा मेळाव्याला नसले तरीही..."; बंधू सुनील राऊतांचे रोखठोक मत

Next

Sanjay Raut, Shivsena Dasara Melava: एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील काही आमदारांच्या साथीने बंडखोरी केली आणि भाजपासोबत सत्तास्थापना केली. शिवसेनेत फुट पडल्यानंतर आज मुंबईत दोन दसरा मेळावे होत आहेत. शिंदे गटाकडून मुंबईतील बीकेसी मैदानात जय्यत तयारी करण्यात आली आहे. तर उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदानही सज्ज झालं आहे. दोन्ही गटाकडून मुंबईत जोरदार शक्तीप्रदर्शन केलं जाणार यात दुमतच नाही. राज्याच्या कानाकोपऱ्यातून दोन्ही गटाचे समर्थक मुंबईत दाखल झाले आहेत. गर्दीची स्पर्धा दोन्ही गटाकडून सुरू आहे. या दरम्यान, शिवसेनेत फूट पडल्यापासून उद्धव ठाकरे यांची बाजू आक्रमकपणे मांडणारे खासदार संजय राऊत यावेळी उपस्थित नसणार आहेत. त्यांच्याबाबत बंधू सुनील राऊत यांनी महत्त्वाचे विधान केले.

एकनाथ शिंदे यांनी जेव्हापासून उद्धव ठाकरेंची साथ सोडली, त्या दिवसापासून संजय राऊत अधिकच आक्रमक झाले. एकीकडे शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात शांततामय मार्गाने चर्चा व्हावी, अशी सामान्य शिवसैनिकांची मागणी होती. पण दुसरीकडे मात्र संजय राऊत शिंदे गटावर खालच्या पातळीवर टीका करतच राहिले. त्यांचा आक्रमकपणा शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटासाठी प्रचंड महत्त्वाचा ठरला. पण सध्या पत्राचाळ प्रकरणात ते अटकेत असल्याने आजच्या दसरा मेळाव्यासाठी त्यांची उपस्थिती नसणार आहे. अशा वेळी त्यांचे बंधू सुनील राऊत यांनी त्यांच्याबद्दल महत्त्वाचे विधान केले. "संजय राऊत हे शिवसेनेचे नेते आहेत. ते महाराष्ट्राचे शिवसेनेचे डॅशिंग नेते आहेत. ते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे जवळचे सहकारीदेखील आहे. संजय राऊत हे आज जरी दसरा मेळाव्यासाठी उपस्थित होऊ शकत नसले तरीही त्यांची उणीव केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील सर्व शिवसैनिकांना उणीव भासणार आहे," असे रोखठोक मत त्यांचे बंधू सुनील राऊतांनी व्यक्त केले.

दरम्यान, महाराष्ट्राच्या राजकारणात आपले वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी सध्या दोन्ही गट प्रचंड प्रयत्न करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. राज्यभरातूनच नव्हे तर संपूर्ण देशातून लाखोंच्या संख्येने कार्यकर्ते मुंबईत येण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईतील दादर, सीएसएमटी स्टेशनवर राज्यभरातून बसेस, वाहने आणि रेल्वे आल्या असून लोक तेथे उतरून शिवसेनेच्या दोन पैकी एका मेळाव्याला जाण्यास निघताना पाहायला मिळाले. सीएसएमटीवर दुपारच्या सुमारास २४ डब्यांच्या दोन ट्रेन दाखल झाल्या. यातून दोन्ही गटाचे सुमारे ५००० कार्यकर्ते बाहेर पडले. दोन्ही गटांचे आमदार आपापल्या कार्यकर्त्यांना घेऊन मुंबईत दाखल झाले आहेत. यातच मुंबई महापालिकेची निवडणूक येत्या काळात होणार असल्याने दोन्ही गटाकडून तुफान शक्तीप्रदर्शन करण्यात येत आहे.

Web Title: Sanjay Raut not present for Shivsena Dasara Melava but he will be surely missed says Uddhav Thackeray Sunil Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.