मुंबई - राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक(Nawab Malik) यांच्यावर ईडीनं कारवाई करुन अटक केली. त्यानंतर आता केंद्रीय तपास यंत्रणांनी शिवसेनेच्या नेत्यावर लक्ष केले आहे. केंद्रीय आयकर विभागाने मुंबई महापालिकेतील शिवसेनेचे नेते आणि स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी धाड टाकली आहे. यामुळे शिवसेना नेते चांगलेच खवळले आहेत. खासदार संजय राऊत यांनी भाजपाचा समाचार घेतला आहे. संजय राऊत यांनी ट्विट करुन केंद्रीय तपास यंत्रणांमध्ये वसुली एजंट असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर करुन आमचे गळे आवरण्याचा प्रयत्न करा परंतु आमच्या तोंडातून सत्यच निघेल. राजकीय फायद्यासाठी तुम्ही केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करायचा. चुकीचे आरोप करायचे. कॅबिनेट मंत्र्याला अटक करायची आणि नंतर तुम्ही आंदोलने देखील करायची, असे म्हणत राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला होता. त्यानंतर, आता केंद्रीय तपास यंत्रणांमध्ये काही वसुली एंजट असल्याचा गंभीर आरोप राऊत यांनी केला आहे. विशेष म्हणजे याबाबतचे पुरावे आपण पंतप्रधान कार्यालयास दिल्याचेही त्यांनी म्हटलंय. लवकरच यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन हे पुरावे सार्वजनिक करणार असल्याचंही ते म्हणाले.
यशवंत जाधव यांच्या घरावर धाड
मागील ५ वर्षापासून यशवंत जाधव हे महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष आहेत. बेनामी कंपन्यांच्या माध्यमातून त्यांनी आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. नवाब मलिक यांच्यानंतर शिवसेनेच्या नेत्यावर केंद्रीय तपास यंत्रणांनी कारवाई केल्यानं शिवसेनेसाठी हा मोठा धक्का आहे.