मुंबई: मागील अनेक महिन्यांपासून सुरू असलेले एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन(ST Workers Strike) संपले असे वाटत असताना आज पुन्हा एकदा एसटी कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीसाठी आक्रमक झाले आहेत. शेकडोच्या संख्येने कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांच्या मुंबईतील सिल्वर ओक निवासस्थानात घुसून आंदोलन केले. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांकडून शरद पवारांच्या घरावर चप्पल आणि दगडफेल करण्यात आली. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
'राज्याचे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न'माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, 'एसटी कर्मचाऱ्यांचे आजचे आंदोलन अंत्यत दुर्दैवी आणि चिंता वाटावी असे आहे. मागील अनेक दिवसांपासून कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत अनेक बैठका झाल्या, चर्चा झाल्या. न्यायालयानेही त्यावर योग्य निर्णय दिला. माझ्या माहितीनुसार, कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्या आहेत. पण, काही लोकांनी पडद्यामागून राज्याचे वातावरण बिघडवण्याचा आणि विशिष्ट गटाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला आहे,' असे राऊत म्हणाले.
'आजचे आंदोलन चुकीच्या मार्गाने'ते पुढे म्हणतात की, 'राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीमुळे काही लोकांच्या पोटात दुखतय. त्यामुळेच ते अशाप्रकारची कृत्य करू पाहत आहेत. शरद पवार संसदीय लोकशाही मानणारे नेते आहेत. आंदोलन मोर्चे जनतेचा हक्क आहे, जनतेचा आवाज समोर येण्यासाठी आंदोलन योग्य आहे, पण आज ज्याप्रकारे आंदोलन झाले, ते अतिशय चुकीच्या मार्गाने झाले.'
'सुप्रिया सुळे हात जोडून उभ्या होत्या'राऊत पुढे म्हणाले की, 'आज जे दृष्य दिसले, ते अत्यंत दुर्दैवी आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीला लाजवणारे आहे. खासदार सुप्रिया सुळे मोठ्या हिमतीने शेकडो आंदोलकांना सामोरे गेल्या आण त्यांना हात जोडून विनंती केली. पण समोरुन ज्याप्रकारी उत्तरे आणि घोषणा येत होत्या, त्या राज्याच्या संस्कृतीला शोभणारे नाही. अंत्यत अमानुष आणि निर्घृण असलेला आजचा प्रकार महाराष्ट्राच्या संस्कृतीला मलीन करण्याचे कारस्थान आहे, असेही ते म्हणाले.