Sanjay Raut PC: हम झुकेंगे नही, झुकाएंगे; शिवसेना नेते संजय राऊतांची फटकेबाजी, भाजपा नेत्यांना घेरलं

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2022 05:57 AM2022-02-16T05:57:40+5:302022-02-16T05:58:09+5:30

‘ईडी’बरोबरच केंद्र सरकार, पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांनाही घेरले

Sanjay Raut PC: Sanjay Raut Attack on BJP Leaders and ED | Sanjay Raut PC: हम झुकेंगे नही, झुकाएंगे; शिवसेना नेते संजय राऊतांची फटकेबाजी, भाजपा नेत्यांना घेरलं

Sanjay Raut PC: हम झुकेंगे नही, झुकाएंगे; शिवसेना नेते संजय राऊतांची फटकेबाजी, भाजपा नेत्यांना घेरलं

googlenewsNext

मुंबई : ‘ हम डरेंगे नही, झुकेंगे नही, झुकाएंगे’ असे सांगत शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत दमदार बॅटिंग केली. केंद्र सरकार, ईडी, पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्र सोडताना त्यांनी भरपूर सिनेस्टाईल डायलॉगही म्हटले आहे.

‘हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है’ असे सांगताना त्यांनी पुरावे म्हणून काही ऑडियो, व्हिडियो क्लिपही आपण लवकरच बाहेर आणू असे जाहीर केले. ‘सुनो ईडीवालो...’असा फिल्मी अंदाजही त्यांच्या बोलण्यात होता. ‘महाराष्ट्र अन् मराठी माणसांवर आक्रमण करणाऱ्यांविरुद्ध रणशिंग फुंकण्यास मी आलो आहे. आम्ही बेईमान नाही. भाजपवाल्यांनी कितीही नामर्दगी करून पाठीत खंजीर खुपसला तरी शिवसेना घाबरणार नाही. आमचेच सरकार राहणार. २०२४ नंतर हे घाबरवणारे कुठे असतील ते बघू, असेही त्यांनी भाजपला बजावले. याच सोमय्याने मुंबईतील शाळांमध्ये मराठी सक्तीची नको म्हणून कोर्टात याचिका केली होती, असा आरोप करताना राऊत यांनी माजी खासदार किरीट सोमय्या यांचा उल्लेख दलाल असा केला. याचं थोबाड बंद करा नाहीतर आम्ही बंद करू, असेही ते म्हणाले.

तीन वेळा ईडीकडे मी स्वत: पुरावे दिले होते
किरीट सोमय्यांच्या भ्रष्टाचाराचे कागद मी तीनवेळा ईडीला पाठविले पण काहीच झाले नाही. ५० गुंठ्यांच्या माझ्या जमिनीची चौकशी करून ईडीवाले त्रास देतात. दुसरीकडे, किरीट सोमय्या ईडीच्या ऑफिसात दही-खिचडी खात बसलेले असतात. ईडी भ्रष्ट आहे, ईडीचे अधिकारीही भ्रष्टाचारी आहेत. हे सगळे ईडीचे वसुली एजंट झालेत. हिंमत असेल तर ईडीने माझ्या घरी यावे. मला दोन वर्षे कैद करेल, असे कोणते जेल बनले नाही, असे आव्हान राऊत यांनी दिले.

सरकार पाडण्यासाठी भाजप नेते मला भेटले
राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी भाजपचे राज्यातील काही नेते तीन वेळा मला भेटले, त्यांनी माझ्यावर दबाव आणला. ‘आम्ही राष्ट्रपती राजवट आणू नाही तर आमदार फोडू, तुम्ही मध्ये पडू नका आम्हाला मदत करा’ असे ते मला म्हणाले. मदत केली नाही तर तुम्हाला टाईट व फिक्स करतील, शरद पवारांच्या कुटंबीयांना करतच आहोत, असेही त्या नेत्यांनी बजावल्याचा दावा राऊत यांनी केला. मी त्यांच्यासमोर झुकलो नाही अन् दुसऱ्याच दिवसापासून माझ्या नातेवाईकांवर छापे सुरु झाले, असे ते म्हणाले.

आज फिर बिल्ली ने...अमृता फडणवीसांचे ट्विट
‘आज फिर एक बिल्लीने दहाडने की कोशिश की है’असे ट्विट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांनी केले. राजकीय घटनाक्रमावरील त्यांचे ट्विट नेहमीच चर्चेत असतात. शिवसेनेच्या वाघाची अमृता फडणवीस यांनी ‘बिल्ली’ अशी खिल्ली उडविल्याची चर्चा या निमित्ताने होत आहे.

सोमय्या म्हणतात...खुशाल चौकशी करा
किरीट सोमय्या यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, २०१७ मध्ये राऊत यांनी माझ्यावर आणि माझी पत्नी मेधावर असेच आरोप केले होते. आता माझा मुलगा नील याचे नाव त्यांनी घेतले आहे. ठाकरे सरकारमधील मंत्री तसेही माझ्याविरुद्ध खटले भरत आहेतच, त्यात पुन्हा एकाची भर. मी व माझ्या कुटुंबाने काहीही चुकीचे केलेले नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किंवा राऊत हे कोविड सेंटरच्या घोटाळ्याचे जे आरोप मी केले त्यावर काहीच का बोलत नाहीत? संजय राऊत यांचे प्रवीण राऊत, सुजित पाटकर यांच्याशी काय संबंध आहेत?

 

Web Title: Sanjay Raut PC: Sanjay Raut Attack on BJP Leaders and ED

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.