मुंबई :
फोन टॅपिंग प्रकरणात शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत Sanjay Raut Phone Tapped यांचा फोन तब्बल ६० दिवस तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे Eknath Khadse Phone Tapped यांंचा फोन तब्बल ६७ दिवस टॅपिंग करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तसेच, अन्य काही राजकीय मंडळींचेही फोन टॅप केले आहेत का? याबाबत अधिक तपास सुरू आहे.
राज्य गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्त असताना वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी काही राजकीय मंडळींसह त्यांच्याशी संबंधितांचे फोन टॅपिंग केल्याचा आरोप आहे. यात संजय राऊत आणि एकनाथ खडसे यांचे फोन टॅप केल्याप्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकारी राजीव जैन यांनी दिलेल्या तक्रारीवरून भारतीय टेलिग्राफ कायदा आणि भादंवि कलमांन्वये गुन्हा दाखल करून कुलाबा पोलीस तपास करत आहेत. याप्रकरणी शुक्लापाठोपाठ राऊत आणि खडसे यांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.
धक्कादायक बाब म्हणजे, तत्कालीन भाजप नेते एकनाथ खडसे यांचाही फोन टॅप करण्यात आला होता. तब्बल ६७ दिवस खडसे यांचा फोन टॅप झाल्याची माहिती समोर आली. खडसे यांच्यासोबतच त्यांचा स्वीय सहायक आणि एका कार्यकर्त्याचाही फोन टॅप करण्यात आल्याचे समजते. तर, संजय राऊत यांचा तब्बल ६० दिवस फोन टॅप केल्याची माहिती समोर आली आहे.