मुंबई- मुंबईत आज अनेक ठिकाणी आयकर विभागाच्या धाडी सुरू आहेत. आपणही एक धाड टाकावी म्हणून आज पत्रकार परिषद घेत आहोत, असं म्हणत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत भाजपा तसंच केंद्रीय तपास यंत्रणांवर घणाघाती आरोप केले. सक्तवसुली संचालनालयाचे (ईडी) अधिकारी राज्यात बिल्डरांना धमकावून वसुली करत असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. ईडी ही तर भाजपाची ATM मशीन झाली असून विविध मार्गांनी वसुली करण्याचं काम ईडीचे अधिकारी करत असल्याचंही राऊत म्हणाले.
ईडीच्या अधिकाऱ्यांच्या बँक खात्यावर अनेक कंपन्यांकडून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर झाले असून त्याचे पुरावे सर्वांना देणार असल्याचं राऊत म्हणाले. "ईडीच्या अधिकाऱ्यांकडून सुरू असलेली वसुली देशातील आजवरचा सर्वात मोठा घोटाळा आहे. जितेंद्र नवलानी यांच्या अकाऊंटवर कोट्यवधी रुपये पाठवले गेले आहेत. अविनाश भोसले यांच्या कंपनीकडून नवलानी यांच्याखात्यावर सुरुवातीला १० कोटी रुपये आणि जेव्हा भोसले यांच्या कंपन्यांची चौकशी सुरू झाली तेव्हा आणखी १६ कोटी रुपये ट्रान्सफर झाले आहेत. आम्ही आतापर्यंत आयकर आणि ईडीला ५० नावं पाठवली. मात्र हे त्यांच्यावर कारवाई करत नाहीत. मी एक खासदार असूनही तक्रारींची दखल घेतली जात नाही. संपूर्ण देशात फक्त महाराष्ट्रातच सर्वाधिक धाडी का?", असा सवाल उपस्थित करत संजय राऊत यांनी जोरदार हल्ला चढवला.
पंतप्रधानांना सारं कळवलंयईडीचे अधिकारी राज्यात कशी वसुलीगिरी करत आहेत याची सर्व माहिती पंतप्रधान मोदींपर्यंत पोहोचवली आहे. ईडीचे एजंट कसं काम करत आहेत याचीही माहिती दिली आहे. किरीट सोमय्या हे महात्मा व्यक्ती असून ते ईडीचे एजंट आहेत. ईडीच्या घोटाळ्याबाबत पंतप्रधानांना २८ पानी पत्र लिहीलं आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं.
ईडीच्या अधिकाऱ्यांची चौकशी होणार "ईडीच्या चार अधिकाऱ्यांविरोधात मुंबईत पोलिसांत तक्रार केली असून त्याची आजपासून चौकशी सुरू होत आहे. ईडीचे काही अधिकारी जेलमध्ये जाणार आहेत आणि यात भाजपाचे नेते देखील सहभागी आहेत. ईडीकडे सारी कागदपत्रं देऊनही कारवाई झालेली नाही. त्यामुळे आता मुंबई पोलीस या प्रकरणात तपास करणार आहेत", असं संजय राऊत म्हणाले.