शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) मुंबईतशिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊन मोठा गौप्यस्फोट करणार आहेत. या पत्रकार परिषदेसाठी शिवसेनेकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. राज्यभरातून शिवसैनिक दादरमध्ये पोहोचले आहेत. भाजप आणि ईडीच्या कारवायांना उत्तर देण्यासाठी संजय राऊत यांनी रणशिंग फुंकले असल्याचं बोललं जात आहे. संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेचं लाइव्ह टेलिकास्ट सर्वांना दिसावं यासाठी शिवसेना भवनाबाहेरील रस्त्यावर दुतर्फा LED स्क्रीन देखील लावण्यात आल्या आहेत.
संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातून शिवसैनिक शिवसेना भवन परिसरात दाखल होऊ लागले असल्यानं मोठी गर्दी झाली आहे. सेना भवनाला पोलीस छावणीचं रुप आलं आहे. मोठा पोलीस बंदोबस्त या परिसरात ठेवण्यात आला आहे. तसंच या कार्यक्रमामुळे दादर शिवसेना परिसरातील वाहतुकीचीही कोंडी होण्याची शक्यता आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आता मुंबई पोलिसांकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. मुंबई पोलिसांनी एक महत्त्वाचं ट्विट करत नागरिकांना पर्याय मार्गाचा वापर करण्याचं आवाहन केलं आहे.
"मुंबईतील सर्व नागरिकांना विनंती करण्यात येत आहे की गडकरी चौक, दादर, मुंबई येथे राजकीय कार्यक्रम असल्याने कोतवाल गार्डन ते गडकरी जंक्शन ते राजबढे चौक दोन्ही वाहिनीवर दुपारी १४.०० ते १८.०० वाजेपर्यंत वाहतूक संथ गतीनं चालू राहू शकते. कृपया आपण नमूद वेळी पर्यायी मार्गाचा वापर करावा", असं ट्विट मुंबई पोलिसांनी केलं आहे.
संजय राऊत नेमका काय गौप्यस्फोट करणार?संजय राऊत यांनी आज शिवसेना भवनात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मोठा गौप्यस्फोट केला जाणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. शिवसेना भवनाच्या बाहेर 'झुकेंगे नही'चे पोस्टर लावण्यात आले आहेत. येत्या काही दिवसात भाजपामधीलच साडेतीन लोक हे अनिल देशमुख यांच्या कोठढीत असतील आणि देशमुख बाहेर असतील असे राऊत यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता भाजपामधील ते साडेतीन लोक कोण? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. शिवसेना भवनातील आजच्या पत्रकार परिषदेसाठी पक्षाचे सर्व पदाधिकारी, आमदार आणि खासदार उपस्थित राहणार आहे. खासदार अनिल देसाई यांनीच तशा सूचना सर्वांना दिल्या आहेत. त्यामुळे ही सर्व वातावरणनिर्मिती पाहता संजय राऊत रायकीय बॉम्ब टाकणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे