Sanjay Raut Allegations: 'ते' पाच नेते अन् ईडीच्या नावानं वसुली...संजय राऊतांनी नेमके कोणते गौप्यस्फोट केले? वाचा १० मुद्दे...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2022 06:15 PM2022-02-15T18:15:43+5:302022-02-15T18:16:25+5:30
sanjay raut press confrence highlights: संजय राऊत यांनी पत्रकार परिषेद पाच जणांवर गंभीर आरोप केले. तसंच ईडीच्या काही वसुली एजंट्सची नावं जाहीर केली. संजय राऊतांनी पत्रकार परिषदेत केलेल्या आरोपांपैकी १० महत्त्वाचे मुद्दे जाणून घेऊयात...
मुंबई-
शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आज मुंबईतील शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊन भाजपा आणि ईडीवर काही गंभीर आरोप आरोप केले. ईडीच्या नावानं मुंबईत सुप्रसिद्ध बिल्डरांकडून वसुली केली जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला. तसंच केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि झारखंडमधील सरकार पाडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं संजय राऊत म्हणाले. संजय राऊत यांनी पत्रकार परिषेद पाच जणांवर गंभीर आरोप केले. तसंच ईडीच्या काही वसुली एजंट्सची नावं जाहीर केली. संजय राऊतांनी पत्रकार परिषदेत केलेल्या आरोपांपैकी १० महत्त्वाचे मुद्दे जाणून घेऊयात...
१. देवेंद्र फडणवीस-
फडणवीसांच्या काळात राज्यात २५ हजार कोटींचा महाटीईटी घोटाळा झाला असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. महाराष्ट्रातील हा सर्वात मोठा घोटाळा असल्याचंही ते म्हणाले आहेत.
२. सुधीर मुनगंटीवार-
राज्यात माजी वनमंत्र्यांच्या मुलीच्या लग्नात ९ कोटी रुपयांचं कार्पेट वापरलं गेलं होतं, असं म्हणत संजय राऊत यांनी नाव न घेता सुधीर मुनगंटीवार यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.
३. किरीट सोमय्या-
संजय राऊत यांनी यावेळी किरीट सोमय्यांवर शेलक्या शब्दात टीका करत त्यांच्यावर घणाघाती आरोप केले. यावेळी राऊत यांनी किरीट सोमय्यांचा उल्लेख 'मुलुंडचा दलाल' असा केला. मुलुंडचा एक दलाल पत्रकार परिषदा घेऊन सांगतो की ईडी कुठे धाड टाकणार आहे, असं संजय राऊत म्हणाले.
४. निकॉन इन्फ्रा कंपनी कुणाची?
किरीट सोमय्याच मराठी भाषेविरोधात सुप्रीम कोर्टात गेले होते आणि हेच भाजपावाले मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देऊ असं म्हणतात, असं संजय राऊत म्हणाले. निकॉन इन्फ्रा कंस्ट्रक्शन ही किरीट सोमय्यांची कंपनी असून घोटाळेबाज राकेश वाधवान त्यांचे पार्टनर आहेत, असा आरोप राऊत यांनी केला.
५. राकेश वाधवान कोण?
पीएमसी बँक घोटाळ्यात ज्याचं नाव समोर आलं तो राकेश वाधवान हा व्यक्ती किरीट सोमय्यांचा पार्टनर असल्याचं संजय राऊत म्हणाले. पीएमसी बँकेतील घोटाळ्याची माहिती आधीच मिळाली आणि सोमय्यांनी पैसे काढून घेतले. याच राकेश वाधवान यानं भाजपाच्या खात्यात २० कोटी रुपयांचा निधी दिला, असा गौप्यस्फोट राऊतांनी केला.
६. निल सोमय्या-
किरीट सोमय्या यांचा मुलगा निल सोमय्या यानं वसईत ४०० कोटींची जमीन ४ कोटींना विकत घेतली आणि तिथं आज मोठा प्रोजेक्ट उभा राहत आहे. सोमय्यांच्या गैरव्यवहाराचे पुरावे तीन वेळा ईडीकडे दिले पण एकदाही दखल घेतली गेली नाही आणि किरीट सोमय्या ईडीच्या कार्यालयात बसून दही-खिचडी खातात. किरीट आणि निल सोमय्या यांना अटक करा, संजय राऊत यांची मागणी.
७. ईडीच्या नावानं बिल्डरांकडून वसुली
ईडीच्या नावाखाली मुंबईत सुप्रसिद्ध ७० बिल्डरांकडून एजंट्सच्या माध्यमातून वसुली केली जात असल्याचा आरोप राऊत यांनी यावेळी केला. जितेंद्र चंद्र नवलानी नावाचा व्यक्ती कोण आहे? हे नाव ऐकून केंद्र सरकार आणि ईडीला घाम फुटला असेल असं संजय राऊत यावेळी म्हणाले.
८. हरियाणातला दूधवाला ७ हजार कोटींचा मालक
हरियाणातील दूधवाला नरवरला ईडी ओळखते का? ईडीची टक्कर आता शिवसेनेशी आहे. एक दूधवाला ७ हजार कोटींचा मालक झाला आहे. महराष्ट्रात आणि फडणवीसांच्या घरात त्याचं येणं जाणं होतं. भाजपाच्या मनी लॉड्रींगच्या केसेस लवकरच देणार असून भाजपाच्या काळातल्या भ्रष्टाचारातून साडेतीन हजार कोटी रुपये महाराष्ट्रातून गेले होते, असा आरोप संजय राऊत म्हणाले.
९. अमित शहांना फोन अन् सरकार पाडण्याच्या धमक्या
काही दिवसांपूर्वी भाजपाचे काही प्रमुख लोक मला भेटले आणि त्यांनी मला सरकारच्या प्रवाहातून बाहेर पडण्यास सांगितलं. आमची संपूर्ण तयारी झाली आहे. राष्ट्रपती राजवट आणू अन्यथा आमदार फोडू पण सरकार आणू असं मला सांगितलं गेलं. तुम्ही आम्हाला मदत केली नाही तर तुम्ही केंद्रीय तपास यंत्रणा टाईट करतील अशा धमक्या दिल्या जात असल्याचं संजय राऊत म्हणाले. तसंच माझ्या जवळच्या लोकांवर रेड सुरू झाल्यानंतर मी अमित शाह यांना फोन केला होता आणि त्यांनाही सांगितलं की माझ्याशी दुष्मनी असेल तर मला पकडा पण माझ्या जवळच्या लोकांना त्रास देऊ नका, असंही संजय राऊत म्हणाले.
१०. मोहित कंबोजचा पत्राचाळ जमीन व्यवहारात घोटाळा, तोच फडणवीसांचा 'फ्रँटमॅन'
मोहित कंबोज नावाचा व्यक्ती देवेंद्र फडणवीसांच्या मर्जीतील त्यांचा फ्रँटमॅन आहे. पण हाच व्यक्ती त्यांना एकदा बुडवणार आहे, असं संजय राऊत म्हणाले. मुंबईत पत्राचाळ येथील जमीन खरेदीत त्याचा हात असून यात पीएमसी बँकेच्या घोटाळ्यातील पैसा वापरला गेल्याचा आरोप त्यांनी केला आहे.