मुंबई - शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर, राऊत यांनी 4 वाजता पत्रकार परिषद घेऊन केंद्रातील भाजप सरकारवर निशाणा साधला. तसेच, केंद्र सरकारकडून ईडी आणि केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचे सांगितले. यावेळी, राऊत यांनी किरीट सोमय्यांचा दलाल असा उल्लेख करत त्यांनी केलेल्या काही आरोपांवर खुलासा केला.
कर्जतमधील कथित जमीन खरेदी प्रकरणावरुन भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निशाणा साधला होता. रश्मी उद्धव ठाकरे यांनी कर्जतमध्ये 8 एकर जमीन घेतली. भाऊ पाटणकर यांच्याकडून बहीण रश्मी ठाकरे यांनी जमीन विकत घेताना मध्ये बोगस बेनामी नावं का? असा सवाल किरीट सोमय्या यांनी विचारला होता. बहिणीने भावाकडून जमीन घेताना दोन बोगस बेनामी नावं उभी केली. ही कमाल उद्धव ठाकरेच करु शकतात. उद्धव साहेब जबाव दो, असं आव्हानच सोमय्या यांनी केला होता. या आरोपावर संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलंय.
पाटणकर यांनी कुठलिही देवस्थानची जमीन खरेदी केली नाही. पाटणकरांनी देवस्थानची जमीन कुठे विकत घेतली हे दाखवा… पाटणकर आणि देवस्थानाचा काहीही संबंध नाही. 2014 साली सलिम बिलाखियाकडून ही जमिनी घेतली, त्यानंतर एकामागे एक अशी 12 जणांनी ही जमीन खरेदी केली. त्यात, 12 व्या नंबरला पाटणकर यांनी ही जमीन खेरदी केल्याचं राऊत यांनी सांगितलं. तसेच, उद्धव ठाकरेंच्या 19 बंगल्याबाबतही राऊत यांनी विधान केलं. जर, 19 बंगले असतील तर आपण तिथं पिकनीकला जाऊ, मी 2 बस करतो, आपण मिळून तेथे पिकनीकला जाऊ, असे राऊत यांनी म्हटले.