मुंबई - मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आपला पूर्वनियोजित अयोध्या दौरा रद्द केला. केवळ प्रकृतीचे कारण नाही, तर हा एक सापळा असून, महाराष्ट्रातूनच त्याला रसद पुरविली जात असल्याचा दावा करत राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा रद्द करण्याची कारणे विषद केली. तर, मनसेकडूनशरद पवार आणि खासदार बृजभूषण सिंह यांचा एक फोटो शेअर करण्यात आला. मनसेच्या या फोटोवर टिकेला राष्ट्रवादीने फोटोनेच प्रत्युत्तर दिलं. तर, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ते लोकं अभ्यासात कच्चे.. असे म्हणत मनसेची एकप्रकारे खिल्लीच उडवली
बृजभूषण शरणसिंह हे आमचे संसदेतील सहकारी आहेत. आम्ही एकत्र बसतो, त्यांना कोण ओळखत नाही. ते खासदार आहेत, आम्ही एकत्र जेवतो. फोटो व्हायरल झाले म्हणजे काय झालं. अभ्यास करा म्हणावं त्यांना अभ्यास, अशा शब्दात मनसेकडून व्हायरल करण्यात आलेल्या फोटोवर खासदार संजय राऊत यांनी टिका केली. संसदेत लोकं कशाप्रमाणे एकत्र बसतात. सभागृहात बसतात, एकत्र चहापान करतात. आम्ही योगींसोबतही चहापान करतो, म्हणजे योगींना आम्ही रसद पुरवली का, त्यांना अडविण्यासाठी, असा प्रश्न राऊत यांनी केला. तसेच, अभ्यासात हे लोक कच्चे आहेत, असा टोलाही लगावला.
Sharad Pawar: फोटोला फोटोनेच उत्तर, राष्ट्रवादीने संदीप देशपांडेचा 'तो' फोटो केला शेअर
मनसेकडून फोटो व्हायरल
राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला उत्तर प्रदेशातील भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी आक्रमकपणे विरोध केला. पुण्यातील सभेत राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा रद्द करण्याची कारणांसह टीकाकारांचा समाचार घेतला. यानंतर आता मनसेचे सरचिटणीस सचिन मोरे यांनी आपल्या ट्विटरवरून एक फोटो शेअर केला. या फोटोची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. मनसेच्या संदीप देशपांडे यांनीही हा फोटो शेअर करत कॅप्शन दिले. ''तेल लावलेले पैलवान आणि गुडघ्यात अक्कल असलेले पैलवान यांची राजसाहेबांविरोधात झालेली युती स्पष्ट दिसत आहे'', अशी टीका देशपांडे यांनी केली आहे.
राष्ट्रवादीनेही केला पलटवार
दरम्यान, राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला कडवा विरोध करणारे भाजप खासदार बृजभूषण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे एका कार्यक्रमानिमित्त (Sharad Pawar) एकत्र बसल्याचे या फोटोत दिसत आहे. त्यामुळे, आता राष्ट्रवादीकडूनही तेल लावलेल्या पैलवानासोबत दादरचा काडी पैलवान... असे म्हणत संदीप देशपांडे यांचा शरद पवारांसमवेतचा फोटो शेअर सोशल मीडियातून शेअर करण्यात आला आहे. तर, काही राष्ट्रवादी समर्थकांनी मनसे नेत्यांच्या ट्विटला उत्तर देतानाही हा फोटो शेअर केला आहे.