'एका पांचट पत्रावरुन राजीनामे घेतले तर कुठेच सरकार काम करू शकणार नाही'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2021 12:25 PM2021-03-23T12:25:33+5:302021-03-23T12:26:02+5:30

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याविषयी शरद पवार यांनी मांडलेली भूमिका हीच सरकारची भूमिका असल्याचे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलंय

sanjay raut react on anil deshmukh resignation and told sharad pawar clarified param bir singh allegation in letter | 'एका पांचट पत्रावरुन राजीनामे घेतले तर कुठेच सरकार काम करू शकणार नाही'

'एका पांचट पत्रावरुन राजीनामे घेतले तर कुठेच सरकार काम करू शकणार नाही'

googlenewsNext
ठळक मुद्देएका पांचट पत्रावरून गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांचे राजीनामे घेतले तर केंद्र सरकार किंवा कोणत्याच राज्यात सरकार काम करू शकणार नाही.

मुंबई - माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी टाकलेल्या लेटरबॉम्बमुळे देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या घटनेवरुन सोमवारी संसदेत चांगलाच गदारोळ पहायला मिळाळा. भाजपासह इतरही काही पक्षांच्या खासदारांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. तर, दुसरीकडे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन परमबीर सिंग यांचा दावा खोडून काढण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच, अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर, आज शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांनी मांडलेली भूमिका हीच सरकारची भूमिका असल्याचं स्पष्ट केलं.  

एका पांचट पत्रावरून गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांचे राजीनामे घेतले तर केंद्र सरकार किंवा कोणत्याच राज्यात सरकार काम करू शकणार नाही. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याविषयी शरद पवार यांनी मांडलेली भूमिका हीच सरकारची भूमिका असल्याचे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलंय. तसेच, गुजरातमधील पोलीस अधिकारी संजीव भट यांनी लिहिलेल्या पत्रात अनेक गंभीर आरोप होते. तेव्हा तत्कालिन मुख्यमंत्री यांचा राजीनामा झाला होता का? तेव्हा सरकारने भट यांचे निलंबन केलं होतं, ही पत्र आता बाहेर आली की भाजपचे नेते थयथयाट करतील का? असा सवाल विचारत हवं तर त्यांना बँड बाजा आम्ही पुरवू, असेही संजय राऊत यांनी म्हटले.  

"परमबीर सिंग यांनी पत्रात नमूद केल्यानुसार फेब्रुवारीच्या मध्यात अनिल देशमुख कोरोनामुळे त्यांच्या राहत्या घरी क्वारंटाइन होते. त्यामुळे त्यांना कुणी भेटण्याचा प्रश्नच उद्भवत नाही", असं म्हणत शरद पवार यांनी परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची हवाच काढून घेण्याचा प्रयत्न केला. अनिल देशमुख कोरोनामुळे रुग्णालयात दाखल असल्याचे आणि डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते क्वारंटाइन असल्याची कागदपत्रंच पत्रकार परिषदेत सादर केली. "अनिल देशमुख फेब्रुवारी महिन्यात ५ ते १५ तारखेपर्यंत कोरोनामुळे रुग्णालयात दाखल होते. १५ फेब्रुवारी रोजी त्यांना डिस्चार्ज मिळाला. त्यानंतर ते १५ ते २७ फेब्रुवारी दरम्यान घरी क्वारंटाईन होते. त्यामुळे परमबीर सिंग यांनी केलेले आरोप आणि वस्तुस्थिती यात खूप फरक आहे. अनिल देशमुख फेब्रुवारी महिन्यात कुणाला भेटण्याची शक्यताच नव्हती हे सिद्ध झालंय", असं पवार म्हणाले. मात्र, त्यानंतर काही वेळातच भाजपा नेत्यांनी ट्विट करुन अनिल देशमुख यांनी 15 फेब्रुवारीला पत्रकार परिषद कसकाय घेतली, असा प्रश्न विचारला. तसेच, गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणीही करण्यात येत आहे. यासंदर्भात आज संजय राऊत यांनी आपली आणि सरकारची भूमिका मांडली. 

देवेंद्र फडणवीस यांचाही सवाल

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अनिल देशमुख यांचे 15 फेब्रुवारीचे ट्विट रिट्विट केलंय. तसेच, 15 ते 27 फेब्रुवारी या कालावधीत अनिल देशमुख होम क्वारंटाईन होते, असे पवार साहेब सांगतात. पण, 15 ला सुरक्षारक्षकांसह, समोर माध्यम प्रतिनिधी अशी पत्रपरिषद झाली होती. हे नेमके कोण? असा प्रश्न फडणवीस यांनी विचारला आहे. या व्हिडिओत अनिल देशमुख पत्रकार परिषद घेताना दिसत आहेत. त्यांच्या पाठीमागे सुरक्षा रक्षकही दिसून येत आहेत. तर, त्यांच्या समोर माध्यमांचे बूम माईकही दिसत आहेत. त्यामुळे, पवारांनी केलेल्या दाव्यावरच प्रश्चचिन्ह निर्माण झालंय. 

पत्रकार परिषदेसंदर्भात देशमुखांचं स्पष्टीकरण

कोरोनाचे निदान झाल्यानंतर मी ५ ते १५ फेब्रुवारीदरम्यान नागपूरमधील रुग्णालयात उपचार घेत होतो. तिथून १५ फेब्रुवारीला डिस्चार्ज झाला. मी रुग्णालयातून बाहेर पडत असताना तिथे रुग्णालयाच्या गेटवर काही पत्रकार उपस्थित होते. मात्र मला कोविडमुळे थकवा आला होता. माझ्या अंगात त्राण नव्हते. त्यामुळे तिथेच खूर्चीवर बसून प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता. त्यानंतर मी १५ ते २७ फेब्रुवारीदरम्यान होम क्वारेंटाइन होतो. पुढे २८ तारखेला मी पहिल्यांदा घराबाहेर पडलो, असे स्पष्टीकरण अनिल देशमुख यांनी दिलंय.

Web Title: sanjay raut react on anil deshmukh resignation and told sharad pawar clarified param bir singh allegation in letter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.