मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) अनेक खळबळजनक आरोप आणि दावे करताना दिसत आहेत. सुरुवातीला समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर मलिकांनी भाजपचे विधासभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार निशाणा साधला. यानंतर महाविकास आघाडीतील नेते आणि भाजप पुन्हा आमनेसामने आल्याचे पाहायला मिळाले. यातच आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्र्यांनी मलिकांचे कौतुक केले असून, आम्ही कोणालाही अंगावर घेण्यास तयार असल्याचे म्हटले आहे.
संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना नवाब मलिक यांना पाठिंबा दर्शवत भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांवर सीबीआय, इडी, आयकर विभाग अशा पद्धतीने धाडी टाकत आहेत, जसे की ते भाजपाचे नोकर असावे. मात्र, २०२४ नंतर परिस्थिती बदलणार असून, हेच शस्त्र तुमच्यावर उलटणार आहे. राज्यात काय सुरू आहे, हे महाराष्ट्रातील जनता बघत आहे. २०२४ मध्ये जनता तुम्हाला तुमची जागा दाखवून देईल. नवाब मलिक यांना मुख्यमंत्र्यांनी पाठिंब दिला आहे. मुख्यमंत्र्यांकडून त्यांचे कौतुक करण्यात आले आहे, त्यामुळे या लढाईत मलिक एकटे नाहीत. आम्ही कोणालाही अंगावर घेण्यास तयार असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
लाज लज्जा असेल तर कंगनाबेनने देशाची माफी मागावी
कंगनाने केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला असून, कंगनाने देशाचा अपमान केला आहे. तिला असे वक्तव्य करायची सवयच आहे. तिच्या या वक्तव्यामुळे भारतीयांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे तिने देशाची माफी मागावी. तिचे सर्व राष्ट्रीय पुरस्कार परत घेतले जावेत. भाजपने देखील ‘कंगनाबेन’च्या या वक्तव्यावर आपली भूमिका स्पष्ट करावी, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझ्या कामाची प्रशंसा केली आणि संपूर्ण मंत्रिमंडळ माझ्या पाठीशी असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी म्हटले आहे. तसे पक्षप्रमुख शरद पवार पवार व राष्ट्रवाद पक्षही पाठिशी असल्याचे सांगितले. मंत्री नवाब मलिक यांनी ज्यांना सध्या घेरले आहे, त्यांची चांगलीच पळापळ होत आहे, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या नेत्यांचे नाव न घेता लगावला. ‘गुड गोईंग’ या शब्दात त्यांनी नवाब मलिक यांचे कौतुक केल्याची चर्चाही माध्यमांत रंगली.