गुन्हा केला नसेल तर चौकशीला निडरपणे सामोरे जावे - संजय राऊत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2019 01:24 PM2019-08-22T13:24:54+5:302019-08-22T13:43:37+5:30
शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्या चौकशीबाबत मत व्यक्त केले आहे.
मुंबई - सीबीआय आणि ईडी चौकशीच्या घटना या देशात अनेकदा घडल्या आहेत. हे काही नवे नाही. जर आपण काही गुन्हा केला नसेल तर निडरपणे सामोरे जाणे हा एकमेव मार्ग आहे,'' असे मत शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्या चौकशीबाबत व्यक्त केले आहे.
राज ठाकरे यांच्या ईडी चौकशीबाबत प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की, राज ठाकरेंच्या चौकशीमधून काही निष्पन्न होणार नाही, असे उद्धव ठाकरे काल म्हणले होते. मलाही तेच वाटते. अशा चौकशा ही एक प्रक्रिया असते. त्यातून अनेकदा लोक तावून सुलाखून बाहेत पडतात. त्यामुळे अशा चौकशीकडे आपण आपण आता त्याकडे तटस्थपणे पाहायला हवे. सीबीआय आणि ईडी चौकशीच्या घटना या देशात अनेकदा घडल्या आहेत. हे काही नवे नाही. जर आपण काही गुन्हा केला नसेल तर बेडरपणे सामोरे जाणे हा एकमेव मार्ग आहे.''
राज ठाकरे यांच्या चौकशीकडे कुटुंब म्हणून उद्धव ठाकरे यांचे लक्ष असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. ''राज ठाकरेंसोबत त्यांचे कुटुंब गेले आहे. स्वतः उद्धव ठाकरे या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत. काल त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. त्या महत्वाच्या आहेत. राजकरणात मतभेद असू शकतात, पण प्रत्येक जण कुटुंबातील प्रमुख व्यक्ती म्हणून आपआपली भूमिका पार पाडत असतो. उद्धव ठाकरे नात्यांबाबतीत अत्यंत संवेदनशील आहेत. उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंशी संवाद झाला की नाही हे टीव्हीवर सांगण्याची गोष्ट नाही. काल त्यांनी जाहीर वक्तव्य केले आणि त्या दोन ओळीत त्यांना काय सांगायचे आहे त्यांच्या भावना स्पष्ट झाल्या आहेत.'' असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
यावेळी राज ठाकरे कुटुंबीयांसह ईडीच्या कार्यालयात गेले म्हणून टीका करणाऱ्या अंजली दमानिया यांनाही संजय राऊत यांनी टोला लगावला. ''सत्यनारायणाची पूजा की श्रावणातील पूजा या नसत्या उठठेवी कुणी करू नयेत. अशा प्रसंगात कुटुंबातील प्रमुख माणसाला आधार द्यायचा असतो. राजकीय कार्यकर्ते असतात. पण कुटुंबाचा आधार महत्वाचा असतो. जेव्हा आम्ही कोर्टात जायचो तेव्हा कुटुंब म्हणून सर्व एकत्र असायचो. ही एक परंपरा आहे..कुणी खून केलेला नाहीये. कुटुंबाने सोबत जाणं ह्याच्यावर टीका करणे हे चांगल्या संस्काराचे लक्षण नाही. ज्यांना कुटुंब आहे तेच कुटुंबाविषयी बोलतात. नाती जपण्याची परंपरा आहे तेच कुटुंबाला घेउन जात असतात. कुटुंबावरती टीका करणे हे अत्यंत हीनपणाचे लक्षण आहे.'' असे संजय राऊत म्हणाले.
''वैयक्तिक मित्र म्हणून राज ठाकरेंबाबत ज्या उद्धव ठाकरेंच्या भावना आहेत. त्याच माझ्याही आहेत. राजकारणात आम्ही सतत एकमेकांच्या विरुद्ध उभे आहोत, पण संकट काळात परिवार एक असतो, मतभेदांची जळमटं गळून पडतात. हे उद्धव ठाकरे यांनी दाखवले. हे बाळासाहेब ठाकरे यांचे संस्कार आमच्यावर आहेत.'' असेही संजय राऊत यांनी सांगितले.