Join us

Sanjay Raut Shivsena: Bhavana Gawali यांना मुख्य प्रतोद पदावरून का हटवलं? संजय राऊतांचे रोखठोक उत्तर (Chief Whip Issue)

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2022 11:03 AM

शिवसेनेने काल तडकाफडकी भावना गवळींची केली उचलबांगडी

Sanjay Raut Shivsena: एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर भावना गवळी (Bhavana Gawali) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना एक पत्र लिहिले होते. यामध्ये भावना गवळी यांनी एकनाथ शिंदे यांची भूमिका योग्य असल्याचे म्हटले होते. त्यानंतर शिवसेनेचे १२ खासदार फुटणार असल्याची चर्चा रंगली. भावना गवळी या भाजपासोबत जातील अशी भिती शिवसेनेच्या गोटात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने भावना गवळी यांना लोकसभेतील प्रतोद पदावरून (चीफ व्हिप) काल दूर केले. या मुद्द्यावर आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिले.

"काल आम्ही संसदीय पक्षातर्फे लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला आणि संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांना पाठवलं आहे. पुढील अडीच वर्षांत अनेक निर्णय घेतले जाणार आहेत. अशा वेळी कामाला गती मिळायला हवी हे महत्त्वाचे आहे. भावना गवळी या उत्तम काम करत होत्या पण त्यांच्या काही कायदेशीर लढाया सुरू आहेत. त्यामुळे त्या दिल्लीत संसदेत काही वेळा येत नाहीत. त्या मधल्या काळात कायदेशीर पेचात सापडल्या होत्या. अशा वेळी मुख्य प्रतोद (चीफ व्हिप) म्हणून व्यक्ती संसदेत हजर असायला हवी. कारण अशा वेळी चीफ व्हिपची फार गरज असते. पक्षाचे आदेश काढायचे असतात. त्यामुळे सगळ्यांशी बोलून उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतलेला आहे. त्यानुसार अमलबजावणी करण्यात आली आहे", अशा शब्दांत राऊतांनी निर्णयामागचे कारण सांगितले.

दरम्यान, भावना गवळी यांच्या जागी ठाण्यातील शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांची लोकसभेत शिवसेनेचे चीफ व्हिप म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकी वेळी प्रतोद पदावरील व्यक्तीचा व्हिप सर्व खासदारांना लागू असणार आहे. त्यामुळे, शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी या संदर्भात संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी पत्र लिहून माहिती दिली. राऊतांच्या पत्रात भावना गवळी यांच्या जागी शिवसेनेचे लोकसभेतील मुख्य प्रतोद म्हणून खासदार राजन विचारे यांची तात्काळ प्रभावाने निवड झाल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता यावर भावना गवळी काय प्रतिक्रिया देतात, हे पाहावे लागणार आहे. आता भावना गवळीही शिवसेनेची साथ सोडून बाहेर पडणार का याकडे साऱ्यांचेच लक्ष आहे.

टॅग्स :संजय राऊतभावना गवळीशिवसेना