“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2024 02:07 PM2024-06-16T14:07:50+5:302024-06-16T14:07:58+5:30
Sanjay Raut News: गेल्या १० वर्षांत मोदी आणि शाह यांनी देशाचे नुकसान केले, त्याला संघही तितकाच जबाबदार आहे. आता संघ काय करतो, याकडे आमचे लक्ष आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
Sanjay Raut News: लोकसभा निवडणूक निकालानंतर भाजपाला चांगलाच धक्का बसल्याचे पाहायला मिळत आहे. ४०० पारचा नारा दिला असला तरी प्रत्यक्षात मात्र २४० जागांवर भाजपाला समाधान मानावे लागले. एनडीएला जनतेने स्पष्ट बहुमत दिले असून, मित्र पक्षांच्या मदतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तिसरी टर्म सुरू झाली आहे. यातच आता डॅमेज कंट्रोल करण्यासाठी भाजपाचे नेते, मंत्री, पदाधिकारी जोमाने कामाला लागले आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या चर्चा झाली. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठे विधान केले आहे.
आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर असून त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी बंद दाराआड चर्चा केल्याची माहिती पुढे आली आहे. मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूरमध्ये एकाच दिवसात दोनदा बंद दाराआड बैठका घेतल्याचे वृत्त आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क वर्तविले जात आहेत. लोकसभा निकालाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, आता संघाचे महत्त्वाची भूमिका घ्यायला हवी, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.
संघ काय करतो याकडे आमचे लक्ष आहे
देशातील लोकशाही वाचवण्यासाठी आणि संविधानाचे रक्षण करण्यासाठी आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच RSSला महत्त्वाची भूमिका घ्यावी लागेल. गेल्या १० वर्षांत जे देशाचे नुकसान झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी जे देशाचे नुकसान केले आहे, त्यासाठी संघही तितकाच जबाबदार आहे. याचे कारण संघाच्या समर्थनानंतर सरकार स्थापन झाले आहे. देशाचे संविधान, लोकशाही, राष्ट्रीय सुरक्षा, काश्मीर, मणिपूर या सगळ्याचे नुकसान झाले, त्यालाही RSS भाजपासोबत बरोबरीने जबाबदार आहे. आता संघाला ही चूक दुरूस्त करायची असेल तर ही चांगली गोष्ट आहे. संघ काय करतो, याकडे आमचेही लक्ष आहे, असे संजय राऊत म्हणाले.
दरम्यान, मोहन भागवत यांनी गोरखपूरमध्ये येऊन योगी आदित्यनाथ यांची घेतलेली भेट ही समान्य भेट नव्हती, असे तीन दशकांपासून संघाशी संबंधित भाजपच्या एका नेत्याने म्हटले आहे. मोहन भागवत उत्तर प्रदेशातील पराभवामागील मुख्य कारणांबाबत योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा करणार होते. याच कारणावरून या दोन्ही बैठका झाल्या असण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे एकीकडे लोकसभेच्या निकालानंतर संघाच्या मुखपत्रातून भाजपावर टीका करण्यात आली होती.