दिल्ली निवडणुकीत ठाकरे गटाचा ‘आप’ला पाठिंबा, आता मुंबईत स्वबळाची तयारी? संजय राऊत म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 15:50 IST2025-01-09T15:50:35+5:302025-01-09T15:50:39+5:30

Sanjay Raut On Upcoming Mumbai Municipal Corporation Election: दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला पाठिंबा देत आहोत, कारण आम आदमी पक्षाने महाराष्ट्राच्या निवडणुकीत आम्हाला पाठिंबा दिला होता, असे ठाकरे गटाने म्हटले आहे.

sanjay raut reaction on thackeray group likely to preparing for contest at its own for upcoming mumbai municipal election | दिल्ली निवडणुकीत ठाकरे गटाचा ‘आप’ला पाठिंबा, आता मुंबईत स्वबळाची तयारी? संजय राऊत म्हणाले...

दिल्ली निवडणुकीत ठाकरे गटाचा ‘आप’ला पाठिंबा, आता मुंबईत स्वबळाची तयारी? संजय राऊत म्हणाले...

Sanjay Raut On Upcoming Mumbai Municipal Corporation Election: दिल्ली विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. दिल्लीत ७० जागांवर ५ फेब्रुवारीला मतदान होणार असून ८ फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहे. इंडिया आघाडीचे घटक पक्ष असलेले आम आदमी पक्ष, काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणुका लढवत आहे. तर भाजपा जोरदार कमबॅक करण्याच्या तयारीत आहे. यातच राष्ट्रीय पातळीवर इंडिया आघाडी घटक पक्ष असलेल्या ठाकरे गटाने आम आदमी पक्षाला पाठिंबा दिल्याचे सांगितले जात आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, मुंबई महापालिका निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढवणार असल्याबाबत तर्क-वितर्क लावले जात आहेत. यासंदर्भात खासदार संजय राऊत यांनी सूचक विधान केले आहे. 

दिल्ली निवडणुकीत काँग्रेस एका बाजूला पडली असून, इंडिया आघाडीत पक्षांनी आम आदमी पक्षाला समर्थन देण्यास सुरुवात केली आहे. समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेसनंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला पाठिंबा जाहीर केला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला पाठिंबा देत आहोत, कारण आम आदमी पक्षाने महाराष्ट्राच्या निवडणुकीत आम्हाला पाठिंबा दिला होता, असे ठाकरे गटाने म्हटले आहे. यावर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.

आता मुंबई महानगरपालिका निवडणुकीत स्वबळाची तयारी?

गेल्या काही दिवसांपासून आगामी मुंबई महापालिकेची निवडणूक ठाकरे गट स्वबळावर लढणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. ठाकरे गटाच्या काही बैठकांमध्ये नेते, पदाधिकाऱ्यांनी स्वबळाचा सूर लावल्याचे सांगितले जाते आहे. याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, इंडिया आघाडी जी बनली ती लोकसभेच्या निवडणुकीसाठी होती. त्या आघाडीला तुम्ही सर्व निवडणुकीत जोडू नका. केजरीवाल आणि त्यांचे सहकारी आमच्या संपर्कात जास्त असतात. दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत ‘आप’ आणि काँग्रेस एकत्र लढले असते तर अधिक चांगला निकाल मिळवू शकले असते. पण महानगरपालिका, नगरपंचायत किंवा दिल्ली विधानसभेच्या निवडणुका यामध्ये कार्यकर्त्यांच्या दबावामुळे या गोष्टी शक्य होत नाहीत. आता जे दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि आम आदमी पक्षात घडले तेच कदाचित मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत होऊ शकते. ज्या लहान निवडणुका असतात त्या ठिकाणी कार्यकर्त्यांचे मनोबल राखण्यासाठी जास्तीत जास्त जागा लढणे जास्त महत्त्वाचे असते, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

दरम्यान, इंडिया आघाडीचे नेतृत्व काँग्रेस करत आहे. मात्र, केजरीवाल यांच्या सारख्या नेत्यांच्या विरोधात ज्या प्रकारे प्रचार केला जात आहे, त्याच्याशी आम्ही सहमत नाही. दिल्ली हा केंद्रशासित प्रदेश आहे. या ठिकाणी अमित शाह, पंतप्रधान मोदी हे तेथील सरकारला काम करू देत नाहीत. दिल्लीत काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने जर निवडणुका एकत्र लढवल्या असत्या तर आम्हाला आनंद झाल असता, असेही ते म्हणालेत.
 

Web Title: sanjay raut reaction on thackeray group likely to preparing for contest at its own for upcoming mumbai municipal election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.