Sanjay Raut News: बदलापूर घटनेचे तीव्र पडसाद अद्यापही उमटताना दिसत आहेत. या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंद पुकारला होता. परंतु, मुंबई उच्च न्यायालयाने हा बंद बेकायदेशीर ठरवत, असा बंद करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. यानंतर महाविकास आघाडीने संप मागे घेतला. परंतु, याविरोधात निदर्शने करणार असल्याचे स्पष्ट केले. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट, तर मुंबईत शिवसेना ठाकरे गटाचे नेते काळी पट्टी लावून निदर्शने करत आहेत. तत्पूर्वी, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी यांच्यापर्यंत आंदोलनाचा आवाज पोहोचवणार असल्याचे म्हटले आहे.
मीडियाशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, जनतेच्या भावना उच्च न्यायालयाने समजून घ्यायला हव्या होत्या. न्यायालयाने दबावाखाली निर्णय दिला, असे मी म्हणणार नाही. कारण शिवसेनेच्या एका खटल्यात तारखावर तारखा पडत आहेत. त्याहीपेक्षा आम्हाला चिंता आहे, राज्यातल्या मुलींची, बहिणींची आणि सर्व महिलांची. त्यामुळेच आम्ही रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला, असे संजय राऊत यांनी सांगितले.
महाराष्ट्रात आज कुणीही सुरक्षित नाही
महाराष्ट्रात आज कुणीही सुरक्षित नाही. न्यायालयालाही लेकी-बाळी आहेत. न्यायदेवताही एक स्त्री आहे. या देशात न्यायदेवतेवर देखील अत्याचार होत आहे. म्हणून आम्ही लढाई करत होतो, असे सांगत न्यायालयात सरकारचा लाडका याचिकाकर्ता जातो आणि न्यायालय यावर बंदी घालते. सरकार जेव्हा अडचणीत येते तेव्हा हा लाडका याचिकाकर्ता न्यायालयात जातो. न्यायालयाचा आदेश मानणे आपली परंपरा आहे. त्यामुळे आम्ही बंद मागे घेतला, अशी टीका संजय राऊतांनी केली.
दरम्यान, लोकशाहीत अशाप्रकारच्या बंदला मान्यता असते. आमचा आवाज कुणी दाबू शकत नाही. मविआचा बंद राजकीय कारणांसाठी नव्हता. राज्यात चिमुरड्या मुली, माता-भगिनींवर अत्याचार होत आहेत. त्यामुळे पंतप्रधान मोदी जे युक्रेन, पोलंड या देशात दौरे करत आहेत, त्यांच्यापर्यंत आमचा आवाज पोहोचावा म्हणून आम्ही हे आंदोलन करत आहोत. आमचा आवाज पोलंडपर्यंत जावा, यासाठी बंदची घोषणा केली होती, असे संजय राऊत यांनी सांगितले.