“नितीश कुमार-चंद्राबाबू सर्वांचेच, आज तुमच्यासोबत आहेत, उद्या आमच्यासोबत येतील”: संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2024 12:28 PM2024-06-07T12:28:13+5:302024-06-07T12:30:18+5:30

Sanjay Raut News: खरे तर सरकार बनवण्याचा अधिकार हा इंडिया आघाडीचा आहे. कारण आम्ही सर्वांनी मिळून भाजपाला बहुमतापासून दूर ठेवले, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

sanjay raut reaction over nitish kumar and chandrababu naidu support bjp for forming central govt | “नितीश कुमार-चंद्राबाबू सर्वांचेच, आज तुमच्यासोबत आहेत, उद्या आमच्यासोबत येतील”: संजय राऊत

“नितीश कुमार-चंद्राबाबू सर्वांचेच, आज तुमच्यासोबत आहेत, उद्या आमच्यासोबत येतील”: संजय राऊत

Sanjay Raut News: लोकसभा निवडणुकीतील धक्कादायक निकालानंतरही बहुमत मिळालेल्या एनडीएकडून सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. एनडीएच्या घटक पक्षांची एक महत्त्वाची बैठक दिल्लीत झाली. यामध्ये खातेवाटपासह अन्य महत्त्वाच्या गोष्टींबाबत चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. यातच राज्यात महायुतीला पराभवाची धूळ चारल्यानंतर महाविकास आघाडीचे नेते आक्रमक झाले आहेत. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेत असतानाच, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या विधानामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. 

पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, नरेंद्र मोदी ९ जून रोजी पंतप्रधान पदाची शपथ घेणार असल्याची माहिती सांगितली जात आहे. एनडीए सरकार चालवताना नरेंद्र मोदी यांच्या नाकीनऊ येतील. मूळात एनडीएमध्ये आहेच कोण? नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू. हे दोघेही जण सर्वांचेच आहेत. आज ते तुमच्याबरोबर आहेत. तर, उद्या आमच्याबरोबर असतील, असे सूचक वक्तव्य संजय राऊत यांनी केले.

हे उद्या राम मंदिरालाही विरोध करतील

नितीश कुमार यांच्या पक्षाने मोदी सरकारच्या अग्निवीर भरतीला विरोध केला आहे. नरेंद्र मोदींनी जे मुद्दे प्रचारात आणले होते, त्याला हे लोक विरोध करत आहेत. उद्या राम मंदिरालाही विरोध करतील. चंद्राबाबू नायडू हे म्हणाले होते की, सत्तेत आल्यानंतर मुस्लिमांना आरक्षण देणार, असे अनेक मुद्दे आहेत. त्यावर चर्चा व्हायची आहे. खरे तर सरकार बनवण्याचा अधिकार हा इंडिया आघाडीचा आहे. कारण आम्ही सर्वांनी मिळून भाजपाला बहुमतापासून दूर ठेवले आहे, असे संजय राऊत म्हणाले.

दरम्यान, नवनिर्वाचित खासदार कंगना रणौत यांना विमानतळावर कानशि‍लात लगावण्यात आल्याची घटना घडली. यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. काही लोक मत देतात आणि काही लोक थप्पड देतात. याबाबत मला जास्त माहिती नाही. सुरक्षारक्षक महिलेने सांगितले की त्यांची आई शेतकऱ्यांच्या आंदोलनात होती. काहीजण त्यांच्याबाबत चुकीचे विधान करत असतील तर हे चुकीचे आहे. सुरक्षारक्षक महिलेला संताप आला असेल. महिला सुरक्षारक्षकाने त्यांच्या आईसाठी कायदा हातात घेतला. कंगना रणौत या सध्या खासदार आहेत. एका खासदारावर अशा प्रकारे हात उचलणे योग्य नाही, असे संजय राऊत यांनी सांगितले.
 

Web Title: sanjay raut reaction over nitish kumar and chandrababu naidu support bjp for forming central govt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.