Join us  

“आमच्या नादाला लागू नका, उद्धव ठाकरे हे...”; रवी राणांच्या दाव्यावर संजय राऊतांचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2024 1:50 PM

Sanjay Raut News: शिवसेना देशाच्या राजकारणातला सर्वांत जुना पक्ष आहे. आमच्या भूमिका काय आहेत. ते आम्ही ठरवू, असे सांगत संजय राऊतांनी रवी राणांवर टीका केली.

Sanjay Raut News: लोकसभा निवडणुकीचा निकाल येण्यासाठी काही तास शिल्लक राहिले आहेत. एक्झिट पोलच्या आकड्यांवरून इंडिया आघाडी आणि एनडीएचे नेते अनेक दावे-प्रतिदावे करत आहेत. यातच राज्यातही महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. यातच रवी राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या एका दाव्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पलटवार केला आहे.

निवडणुकीच्या निकालानंतर वीस दिवसांमध्ये उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत येणार. पंतप्रधान मोदी यांनी उद्धव ठाकरे यांच्यासाठी जी खिडकी उघडून ठेवली आहे, त्या खिडकीतून उद्धव ठाकरे येतील. मोदी यांनी आधीच सांगितले आहे की, उद्धव ठाकरे यांच्यासाठी बाळासाहेब यांचे सुपूत्र म्हणून माझी नेहमी त्यांच्यासाठी एक खिडकी उघडी आहे. दाव्याने सांगतो की, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर वीस दिवसातच उद्धव ठाकरे सरकारमध्ये दिसतील, कारण येणारा काळच देशाच्या विकासासाठी पंतप्रधान मोदीजी आहेत हे उद्धव ठाकरे यांना माहिती आहे, असा दावा रवी राणा यांनी केला होता. रवी राणा यांच्या या दाव्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. यानंतर संजय राऊत यांनी रवी राणांवर टीका केली.

आमच्या नादाला लागू नका

रवी राणांचा आताच राजकारणाशी संबंध आला असून, त्यांनी आमच्या पक्षाच्या भूमिकेवर बोलावे, हे योग्य नाही. शिवसेना पक्ष हा देशाच्या राजकारणातला सर्वांत जुना पक्ष आहे. बाळासाहेब ठाकरेंनी या पक्षाची सुरुवात केली होती. उद्धव ठाकरे हे १५ वर्षांपेक्षा जास्त काळापासून या पक्षाचे नेतृत्व करत आहेत. आमच्या पक्षाचे १८ खासदार निवडून आले आहेत. अशा पक्षाच्या भूमिकेवर राणांसारख्या व्यक्तीने बोलावे, योग्य नाही. रवी राणा यांनी त्यांचे राजकारण बघावे. निवडणुका लढवाव्यात. ही लोकशाही आहे. आमच्या नादाला लागू नका, आमच्या भूमिका काय आहेत. ते आम्ही ठरवू, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांच्याकडून पंतप्रधान मोदी यांना भेटण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. उद्धव ठाकरे यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडीत यायचे आहे. त्यासाठी उद्धव ठाकरे हे अनेक लोकांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत मेसेज पाठवत आहेत, असा दावा करत, महाराष्ट्रात निघालेले फतवे व उशीरा जाहीर झालेल्या जागांमुळे आम्हाला नुकसान झाले. आम्ही आता विधानसभेला जास्त काळजी घेऊ. आम्हाला विधानसभा निवडणुकीत अपेक्षित जागा मिळतील, असा विश्वास शिवसेना शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.

टॅग्स :संजय राऊतरवि राणारवी राणाउद्धव ठाकरेलोकसभा निवडणूक २०२४लोकसभा निवडणूक २०२४ निकालमहाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४