Sanjay Raut News: विधान परिषदेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीकडून उमेदवार देण्यात आले आहेत. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र, महायुती किंवा महाविकास आघाडीने उमेदवार मागे न घेतल्यामुळे ही निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे तीनही उमेदवार निवडून येतील, असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, क्रॉस वोटिंगची भीती सर्वांनाच असते. राज्यसभेच्या वेळेला खुले मतदान असते, विधान परिषदेचे मतदान अशा प्रकारे व्हावे, घोडेबाजार थांबवण्यासाठी ही आमची भूमिका कायम राहील. आता महाराष्ट्राच्या निवडणुका आहेत, महाविकास आघाडी कडून आमचे तीन उमेदवार आहेत. काँग्रेसच्या प्रज्ञा सातव, शेकापचे जयंत पाटील, शिवसेनेकडून मिलिंद नार्वेकर या तिन्ही जागा आम्ही जिंकू. अशी आम्हाला खात्री आहे. शिंदे गट,अजित पवार गट, फडणवीस यांचा गट यांनी त्यांच्या जागा सांभाळाव्यात, निवडणूक होणार हे नक्की आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
क्रॉस वोटिंगची भीती सर्वांत जास्त सत्ताधारी पक्षाला
आता कोण पडतंय आणि कोणाला क्रॉस वोटिंगची भीती आहे. त्यामुळे अलीकडच्या काळामुळे आपापले आमदार त्यांना सांभाळावे लागत आहेत. क्रॉस वोटिंगची भीती सर्वांत जास्त सत्ताधारी पक्षाला आहे. लोकसभा निवडणुकीचे जे निकाल लागलेले आहेत, ते पाहता महायुती म्हणून जो काही प्रकार आहे पूर्णपणे पराभूत झाल्यामुळे अनेक आमदारांना आपल्या भविष्याची चिंता वाटते, अशा परिस्थितीत कोणता आमदार काय निर्णय घेईल हे सांगता येत नाही. आम्ही नक्कीच आमच्या आमदारांसोबत आहोत. आमचे सर्व आमदार आमच्यासोबत आहे. आम्हाला क्रॉस वोटिंगची भीती अजिबात नाही, असे संजय राऊतांनी सांगितले.
दरम्यान, भाजपने जो जास्तीचा उमेदवार दिला आहे, तो त्यांनी मागे घ्यावा आणि घोडेबाजार थांबवावा. आत्तापर्यंत फडणवीस आणि काही लोकांनी या महाराष्ट्रात प्रचंड घोडेबाजार सत्तेच्या बळावर, तपास यंत्रणा आणि पोलीस यंत्रणांच्या बळावर केला पण आता ते त्यांना जमणार नाही, असा दावा करत, त्यांनी उमेदवार मागे घ्यावा. त्यांच्याकडे कुठे मतदान आहे. अजित पवारांकडे किंवा शिंदे गटाकडे दुसरा उमेदवार निवडून आणावा, ही मतच नाहीत, असे संजय राऊत म्हणाले.