Join us

राज ठाकरेंशी युती करण्याची चर्चा ठाकरे गट शिवतीर्थावर जाऊन करणार का? संजय राऊत म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2025 16:35 IST

Thackeray Group Sanjay Raut News: उद्धव ठाकरे यांनी कोणतीही अट ठेवलेली नाही, असे संजय राऊतांनी म्हटले आहे.

Thackeray Group Sanjay Raut News:राज ठाकरे आणि उद्धव हे ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा पुन्हा हा सुरू सुरू झाली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत याबाबत केलेले सुतोवाच आणि त्याला उद्धवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेला सकारात्मक प्रतिसाद या पार्श्वभूमीवर ही चर्चा यावेळी प्रत्यक्षात साकार होण्याची आशा दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटत आहे. राज ठाकरे यांनी महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीत मनोमिलनाचे संकेत दिले. त्याला उद्धव ठाकरे यांनी कामगार सेनेच्या मेळाव्यात बोलताना राज यांच्या हाकेला सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानंतर राजकीय क्षेत्रात संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. 

पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चांवर स्पष्ट शब्दांत भाष्य केले. तुम्ही शिवाजी पार्कवरील कॅफे असा उल्लेख करता, त्या राज ठाकरे यांच्या शिवतीर्थावर जाऊन ठाकरे गट युतीची चर्चा करणार का, असा प्रश्न संजय राऊतांना करण्यात आला. यावर संजय राऊत यांनी सूचक विधान केले आहे. 

राज ठाकरेंशी युती करण्याची चर्चा ठाकरे गट शिवतीर्थावर जाऊन करणार का? 

संजय राऊत म्हणाले की, तुम्हाला काय वाटते की, आम्ही राज ठाकरे यांच्याबरोबर बोलत नाहीत का? मग का जाणार नाही? उद्धव ठाकरे यांनी कोणतीही अट ठेवलेली नाही. मला सांगा त्यात अट आणि शर्त कोणती? कोणतीही नाही. राज ठाकरे म्हणत आहेत की, महाराष्ट्र हितासाठी आणि उद्धव ठाकरे हेही महाराष्ट्राच्या हितासाठीच म्हणत आहेत. मग प्रश्न एवढाच आहे की महाराष्ट्र हिताच्या फॉर्म्युल्यात भाजपा बसत नाही. ही अट नाही, तर लोकभावना आहे. हा विषय विशेषतः महाराष्ट्राच्या भावनेचा आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, मतभेद आणि वाद दूर ठेवून जर दोन्ही ठाकरे एकत्र येणार असतील तर आम्ही त्यांचे स्वागत केले आहे. यामध्ये कोणतीही अट किंवा शर्त उद्धव ठाकरे यांनी ठेवलेली नाही. महाराष्ट्र हितालाच प्राधान्य द्या, जे महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या हिताचे शत्रू आहेत, त्यांच्या पंक्तीलाही बसू नका. यात कोणती अट आणि शर्त आली? उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे की, जे लोक महाराष्ट्र हिताच्या आडवे येतील त्यांना घरात घ्यायचे नाही, त्यांचे स्वागत करू नका. यात चुकीचे काय आहे? असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

 

टॅग्स :संजय राऊतशिवसेनाउद्धव ठाकरेमनसेराज ठाकरे