होय, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत - संजय राऊत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2020 08:46 PM2020-02-20T20:46:04+5:302020-02-20T20:51:09+5:30
येत्या सोमवारपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे.
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, यावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी शिक्कामोर्तब केले आहे.
याबाबत स्वतः संजय राऊत यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. तसेच, ही सदिच्छा भेट असल्याचे म्हणत या भेटीच्या तपशिलात खोल शिरण्याची गरज नसल्याचे सुद्धा संजय राऊत यांनी म्हटले आहे. "होय, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उद्या दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत आहेत. ही सदिच्छा भेट आहे. बाकी तपशिलात खोल शिरण्याची गरज नाही. जय महाराष्ट्र.", असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे.
होय
— Sanjay Raut (@rautsanjay61) February 20, 2020
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.ऊदधव ठाकरे हे ऊद्या दिल्ली येथे मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत आहेत.
ही सदिच्छा भेट आहे.
बाकी तपशिलात खोल शिरण्याची गरज नाही.
जय महाराष्ट्र
दरम्यान, मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांची ही पहिलीच दिल्ली भेट आहे. मी पंतप्रधानांना भेटायला जाणार असल्याचे उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वीच म्हटले होते. 'मुख्यमंत्री झाल्यावर मी दिल्लीला जाणार आहे. माझ्या मोठ्या भावाची भेट घेणार आहे. कारण पंतप्रधान मोदी मला त्यांचा लहान भाऊ म्हणतात,' असे उद्धव ठाकरे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आमदारांना संबोधित करताना म्हणाले होते.
याचबरोबर, येत्या सोमवारपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरे पंतप्रधानांची भेट घेऊ शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मुख्यमंत्री राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी मोदींची सदिच्छा भेट घेऊन राज्यासाठी आर्थिक मदत मागू शकतात.