मुंबई - बंडाचा झेंडा फडकवत आसाममधील गुवाहाटी येथे पोहोचलेल्या एकनाथ शिंदे आणि इतर बंडखोर आमदारांविरोधात शिवसेनेने कमालीची आक्रमक भूमिका घेतली आहे. काल १२ आमदारांच्या निलंबनाची मागणी केल्यानंतर आता शिवसेनेने पुढील चाली खेळण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, आज यशवंतराव चव्हाण सेंटर येथे शिवसेना नेते संजय राऊत यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर बंडखोरांना आव्हान दिले आहे.
बाळासाहेबांच स्मरण करून सांगतो आम्ही हार मानणार नाही, आम्ही जिंकणार, आमची संपूर्ण तयारी झाली आहे, आता तुम्ही मुंबईत याच, असा इशारा संजय राऊत यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना दिला आहे.
राज्यातील सध्याच्या स्थितीबाबत शरद पवार यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत हे कमालीच्या आक्रमक पावित्र्यात दिसले. बाळासाहेबांचं स्मरण करुन सांगतो आम्ही आता हार मानणार नाही. आम्ही जिंकणार, विधानसभेत विश्वास ठरावही जिंकू. या मंडळींनी खूप चुकीचं पाऊल उचललं आहे. आम्ही खूप समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र आता वेळ निघून गेली आहे, असे संजय राऊत म्हणाले.
आता आमची शरद पवार, अनिल देसाई, दिलीप वळसे पाटील बैठक झाली. मुख्यमंत्रीही या बैठकीत होते. संपूर्ण तयारी झाली आहे. आता तुम्ही याच, आमचं चॅलेंज आहे. राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार मजबूत आहे. हे सरकार पुढची अडीच वर्षं सत्तेत राहील. तसेच पुन्हा निवडून येईल, असा विश्वासही संजय राऊत यांनी यावेळी व्यक्त केला.
शरद पवार महाविकास आघाडीचे सर्वात मोठे नेते आहे. आम्ही तर त्यांना भिष्म पितामह म्हणतो. त्यांनी आता या संपूर्ण प्रकरणात लक्ष घातले आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे सतत संपर्कात आहेत, असंही संजय राऊत यांनी यावेळी सांगितलं.