Sanjay Raut on Devendra Fadnavis: “बाबरी कोणी पाडली? ऐका...”; राऊतांनी फडणवीसांना दिला पुरावा, अडवाणींचा व्हिडिओ ट्विट
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2022 05:11 PM2022-05-02T17:11:42+5:302022-05-02T17:12:35+5:30
Sanjay Raut on Devendra Fadnavis: संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर पलटवार करत थेट पुरावाच दिला आहे.
मुंबई: भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी बुस्टर डोस सभेत बाबरी मशीद पतनाचा मुद्दा काढत, शिवसेनेवर घणाघाती टीका केली. याला शिवसेना नेत्यांकडून प्रत्युत्तर दिले जात आहे. यातच आता बाबरी मशिदीच्या पतनावरून शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचा एक व्हिडिओ ट्विट केला आहे. या ट्विटच्या माध्यमातून संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देवेंद्र फडणवीस यांना थेट पुरावा दिल्याचे म्हटले जात आहे.
बाबरी मशीद पडली त्यावेळी शिवसेनेचे नेते कोणत्या बिळात होते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, बाबरी पडली तेव्हा शिवसेनेचा एकही नेता उपस्थित नव्हता, असा दावाही फडणवीसांनी केला. यासह बाबरी पतनानंतर आम्ही तुरुंगात होतो. भाजपच्या ३२ नेत्यांवर गुन्हेही दाखल झाले, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. यानंतर संजय राऊत यांनी एक ट्विट करत यावर भाष्य केले आहे.
बाबरी कोणी पाडली? ऐका...
संजय राऊत यांनी लालकृष्ण अडवाणींचा २९ डिसेंबर २००० रोजीचा व्हिडिओ ट्विट केला. या व्हिडिओमध्ये एका न्यूज चॅनलच्या मुलाखतीत बाबरी मशीद पाडण्याच्या विषयावर बोलताना अडवाणींनी मराठी भाषिकांचा उल्लेख केला आहे. या व्हिडिओ अडवाणी म्हणतायत की, बाबरी मशिदीचे पतन ही खूप मोठी चूक होती. त्यात काहीही शंका नाही. पहिल्यांदा उमा भारती यांना तिथे पाठवले आणि सांगितलं की त्यांना खाली उतरवा. त्यांना सांगा की, असे काही करु नका. जेव्हा त्या परतल्या तेव्हा त्यांनी मला सांगितले की मशिदीवर काही लोक आहेत आणि ते 'मराठी'त बोलत आहेत. ते माझे ऐकत नाहीयेत. त्यानंतर प्रमोद महाजनांना पाठवले. ते तिथे गेले. पण, तेही हताश होऊन परत आले. त्यांनंतर माझ्यासोबतच्या पोलिसांना सांगितले की मला वर जायचे आहे. पण, ते मला म्हणाले की आम्ही तुम्हाला त्याची परवागनी देऊ शकत नाही, असे अडवाणी त्या व्हिडिओत सांगताना दिसत आहेत. या ट्विटला बाबरी कोणी पाडली? ऐका... असे कॅप्शन दिले आहे.
दरम्यान, संजय राऊतांनी आणखी एक ट्विट केले. त्यामध्ये वृत्तपत्राचे काही कटआऊट्सचे फोटो टाकले आहेत. यामध्ये 'शिवसेना कार्यकर्ता बॉम्ब घेऊन अयोध्येला जाणार', 'शिवसेना प्रदेश प्रमुखांच्या घरावर छापा', 'खवळलेल्या हिंदू महासागराने राजजन्मभूमीचा ताबा घेतला', अशा बातम्यांचे हे कटआऊट्स आहेत. या ट्विटला संजय राऊतांनी 'आता बोला..' असे कॅप्शन दिले आहे.