Join us

“नरेंद्र मोदी लटकता आत्मा, आमचे पवित्र आत्मे त्यांच्यासोबत जाणार नाही”; संजय राऊतांचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2024 2:24 PM

Sanjay Raut News: नरेंद्र मोदी यांना विश्रांतीची गरज आहे. प्रकृती बरी नसल्यामुळे ते अशा प्रकारची विधाने करत आहेत, अशी टीका संजय राऊतांनी केली.

Sanjay Raut News: काँग्रेस आणि आमच्या विचारधारेत फारसा फरक नाही. माझ्या पक्षाच्या विलिनीकरणाबाबत सहकाऱ्यांसोबत चर्चा केल्याशिवाय मी काहीही सांगू शकत नाही. वैचारिकदृष्ट्या आम्ही काँग्रेसच्या जवळ आहोत, असे सांगत शरद पवार यांनी काँग्रेसमध्ये पक्ष विलीन करण्याबाबत सूचक विधान केले होते. शरद पवार यांच्या या विधानावरून राजकीय वर्तुळात जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत. यातच लोकसभा निवडणुकीच्या पुढील टप्प्यातील प्रचारसभेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नंदूरबार येथे सभा झाली. या सभेत पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना जाहीर ऑफर दिली. यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपा आणि नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार पलटवार केला.

महाराष्ट्राचे एक दिग्गज नेते ४० वर्षांपासून फिरत आहेत. बारामतीच्या निवडणुकीनंतर ते खूप चिंतेत आहेत. त्यांनी एक विधान केले आहे जे मला वाटते की, त्यांनी अनेकांसोबत चर्चा करुन केले असेल. ते इतके हताश आणि निराश झालेत की त्यांना वाटत आहे की, ४ जूनच्या नंतर राजकारणात टिकून राहायचे असेल तर छोट्या राजकीय पक्षांना काँग्रेसमध्ये विलीन व्हायला हवे. याचा अर्थ असा की, जी नकली राष्ट्रवादी आणि शिवसेना आहे, त्यांनी काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा निर्णय घेतला आहे. ४ जूननंतर काँग्रेसमध्ये जाऊन मरण्यापेक्षा छातीठोकपणे अजित पवार आणि एकनाथ शिंदेंसोबत या. मोठ्या अभिमानाने स्वप्ने साकार होतील, अशी ऑफरच पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना दिली. महाविकास आघाडीतील नेत्यांकडून याला प्रत्युत्तर दिले जात असताना, संजय राऊतांनी नरेंद्र मोदी यांच्या या विधानावर बोचरी टीका केली. 

लटकत्या आत्म्याबरोबर महाराष्ट्रातील पवित्र आत्मे कधी जाणार नाहीत

नरेंद्र मोदी लटकता आत्मा आहे. इकडे तिकडे लटकत फिरतो आहे. या लटकत्या आत्म्याबरोबर आमचे महाराष्ट्रातील पवित्र आत्मे कधी जाणार नाहीत. नरेंद्र मोदी यांना कळत नाही की, ते नक्की कुठे लटकत आहेत. त्यांची वक्तव्ये पाहा. आज एक, उद्या एक आणि काल एक. नरेंद्र मोदी यांची प्रकृती बरी नसावी, असे मला सारखे वाटत आहे. हे मी वारंवार सांगत आहे. भाजपामधील त्यांच्या सहकार्यांनी त्यांची प्रकृती तपासून घ्यावी. त्यांना उपचारांची गरज आहे. विश्रांतीची गरज आहे. त्यांची प्रकृती बरी नसल्यामुळे ते अशा प्रकारची विधाने करत आहेत, या शब्दांत संजय राऊत यांनी पलटवार केला.

दरम्यान, पुढील २ वर्षांत अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसशी अधिक जवळीक साधतील किंवा त्यातील काहींना काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा पर्याय त्यांच्या पक्षासाठी चांगला असेल असे वाटू शकते. तसेच काँग्रेस आणि आमच्या विचारधारेत फारसा फरक नाही. माझ्या पक्षाच्या विलिनीकरणाबाबत सहकाऱ्यांसोबत चर्चा केल्याशिवाय मी काहीही सांगू शकत नाही. वैचारिकदृष्ट्या आम्ही काँग्रेसच्या जवळ आहोत. परंतु पुढील काळातील निर्णय आणि रणनीती ही सामूहिकपणे विचार करून घेतले जातील, असे शरद पवार म्हणाले होते. 

टॅग्स :संजय राऊतमहाविकास आघाडीशिवसेनामहाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४लोकसभा निवडणूक २०२४नरेंद्र मोदी