मुंबई-
राज्यात शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर आता एकनाथ शिंदे गटात सामील झालेले सर्व आमदार शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याबद्दलची नाराजी उघडपणे व्यक्त करु लागले आहेत. संजय राठोड, शंभुराजे यांच्यापासून संजय शिरसाट यांनी संजय राऊत यांच्यामुळेच शिवसेना सोडली असा आरोप केला. तसंच सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांनीही संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका करत राऊत शिवसेनेचे नव्हे, पवारांचे प्रवक्ते असल्याचं विधान केलं. त्यावर आज पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी शहाजी बापू पाटील यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.
"शहाजी बापू पाटील आधी कुठं होते? ते आता शिवसेनेत आलेत. मी काय मोदीही शरद पवारांचं कौतुक करतात. शरद पवारांचं बोट पकडून राजकारणात आलोय असं मोदी म्हणतात. मग मोदींना तुम्ही असंच म्हणणार का? ते काय झाडी, काय डोंगर ते सारं ठिक आहे. त्यापुढे किती खोकी असंही आमदार कैलास गोरंट्याल यांनी म्हटलंय", असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
काय म्हणाले होते शहाजी बापू पाटील?सांगोलच्या शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी एबीपी माझा वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात संजय राऊत यांच्यावर टीका केली. "संजय राऊत रोज सकाळी उठतात आणि कचाकचा बोलतात. आग लावून देतोत. त्यांना आधी कुलूप लावून बंद करा. आम्ही घरातून बाहेर पडलो की सकाळसकाळ आमच्या डोक्याला टेन्शन येतं. सारखं टीव्हीवर येऊन पवार साहेब जागतिक नेते, पवार साहेब आमचे नेते असं कौतुक करत असतात मग त्यांनी तिथंच जावं की. शिवसेनेचे प्रवक्ते आहात तर उद्धव साहेबांबद्दल बोला की. नाहीतर आम्हाला आमच्या साहेबांबद्दल बोलू द्या", असं शहाजी बापू म्हणाले होते.