“शिवसेनेत आजही जिद्द कायम, आमचे सर्व नेते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरतील”: संजय राऊत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 13:11 IST2025-02-27T13:04:58+5:302025-02-27T13:11:10+5:30
Thackeray Group Sanjay Raut News: आता आम्ही बाहेर पडलेलो आहोत. राज्यभरात विभागीय शिबिरे घेण्यात येणार असून, ईशान्य मुंबईतील कार्यक्रमात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे मार्गदर्शन करणार असल्याचे संजय राऊतांनी सांगितले.

“शिवसेनेत आजही जिद्द कायम, आमचे सर्व नेते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरतील”: संजय राऊत
Thackeray Group Sanjay Raut News: उद्धवसेनेचे लोकसभा आणि विधानसभानिहाय संपर्कप्रमुख आणि स्थानिक पदाधिकारी यांच्यातील मतभेद दूर करण्याची जबाबदारी पक्षातल्या उपनेत्यांवर देण्यात आली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात राहून हे उपनेते आपला अहवाल त्यांना सादर करणार आहेत, अशी माहिती उद्धवसेनेच्या सूत्रांनी 'लोकमत'ला दिली.
शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून ९ मार्च रोजी ईशान्य मुंबईत पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित केला जाणार आहे. गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाला लागलेली गळती रोखण्यासाठी महाराष्ट्रात विभागवार मेळावे घेतले जाणार आहेत. संजय राऊत यांनी मुलुंड येथील कालिदास नाट्यगृहात जाऊन पाहणी केली. यानंतर पत्रकारांशी बोलताना संजय राऊतांनी सविस्तर माहिती दिली.
शिवसेनेत आजही जिद्द कायम
संजय राऊत यांनी सांगितले की, आम्ही जेव्हा पक्षाचे काम सुरू केले, तेव्हा शिवसेनेची विभाग शिबिरे नेहमी घेत होतो. शाखांचे वर्धापन दिन आमच्या काळात साजरे होत होते. त्या वर्धापन दिनाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे शाखेत येत असत. आम्हाला त्या पद्धतीने नव्याने काम करणे गरजेचे आहे, असे लक्षात आले. पराभव होत असतात, लोकसभेला जिंकलो, विधानसभेला आम्ही जिंकू शकलो नाही. पण शिवसेनेचा उत्साह आणि जिद्द कायम आहे. ज्या प्रकारे दबावाचे राजकारण सुरू आहे, प्रशासनमध्ये जे भाई निर्माण झाले आहे, ईव्हीएममुळे आम्ही हरलो, पैशामुळे हरलो, असे असले तरी आम्हाला कार्यकर्त्यांना एक प्रोत्साहन देणे गरजेचे आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे मार्गदर्शन करणार
पुढे बोलताना संजय राऊत यांनी सांगितले की, राज्यभरामध्ये विभागीय शिबीर करण्याची योजना आहे. ईशान्य मुंबईतून याची सुरुवात होत आहे, त्या दिवशी दिवसभर कार्यक्रम असेल. उद्धव ठाकरे येणार आहेत. उद्घाटनाला सकाळी आदित्य ठाकरे असतील. ते मार्गदर्शन करतील. शिवसेनेचे सर्व नेते शिवसैनिकांना मार्गदर्शन करतील. या भागात शिवसेना एक ठोस कार्यक्रम घेऊन पुढे जाईल. आम्ही आता बाहेर पडलेलो आहोत. शिवसेना आता बाहेर पडलेली आहे. संपूर्ण राज्यातील नेमणुकांची काम पूर्ण होतील. शिवसेनेचे सर्व नेते महाराष्ट्रभर कानाकोपऱ्यात फिरतील, असा दावा संजय राऊत यांनी केला.
ठाकरे गटात बैठकांचे सत्र
उद्धवसेनेचे माजी आमदार,पदाधिकारी शिंदेसेनेत प्रवेश करीत आहेत. पक्षाची होणारी पडझड रोखण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी बैठकांचे सत्र सुरू केले आहे. शिवसेना भवनात ठाकरे गटाचे नेते आणि उपनेते यांची बैठक झाली. ज्येष्ठ नेते सुभाष देसाई, दिवाकर रावते, संजय राऊत, अरविंद सावंत यांच्यासह पक्षाचे १५ नेते आणि ४९ उपनेते यावेळी उपस्थित होते, असे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, स्थानिक पदाधिकाऱ्यांत यांच्यात मतभेद निर्माण होतात. पक्षाच्या प्रत्येक उपनेत्यावर किमान चार ते पाच विधानसभांची जबाबदारी देण्यात येणार आहे. उपनेत्यांसोबत चर्चा करून कुणाला कुठली विधानसभा द्यायची याचा निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेणार आहेत. पुढील बैठकीपर्यंत उपनेत्यांना विधानसभांचे वाटप झालेले असेल, असेही सूत्रांनी सांगितले.