Sanjay Raut: संजय राऊतांना अटक, सुनावणी, ईडीच्या कोठडीत रवानगी, पुढे काय होणार? बंधू सुनील राऊत म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2022 04:45 PM2022-08-01T16:45:28+5:302022-08-01T16:46:05+5:30
Sanjay Raut News: रविवारी सकाळपासून संजय राऊत यांच्या घराची झाडाझडती घेतल्यानंतर संध्याकाळी ईडीने त्यांना ताब्यात घेतले होते. तर रात्री उशिरा त्यांना अटक करण्यात आल्याची घोषणा केली होती. दरम्यान, या सर्व घटनाक्रमांवर संजय राऊत यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई - पत्रा चाळ घोटाळा प्रकरणात अटक झालेले शिवसेना नेते संजय राऊत यांना कोर्टाने चार ऑगस्टपर्यंत ईडीची कोठडी सुनावली आहे. रविवारी सकाळपासून संजय राऊत यांच्या घराची झाडाझडती घेतल्यानंतर संध्याकाळी ईडीने त्यांना ताब्यात घेतले होते. तर रात्री उशिरा त्यांना अटक करण्यात आल्याची घोषणा केली होती. दरम्यान, या सर्व घटनाक्रमांवर संजय राऊत यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमचा न्यायालयावर विश्वास आहे. न्यायव्यवस्था आपलं काम चोखपणे करेल, संजय राऊत यांना नक्की न्याय मिळेल, असे सुनील राऊत म्हणाले.
आज पीएमएलए कोर्टाने दोन्हीकडचे युक्तिवाद ऐकल्यानंतर संजय राऊत यांना ४ ऑगस्टपर्यंत ईडीची कोठडी सुनावली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत म्हणाले की, काल सकाळी ईडीचे अधिकारी आमच्या घरी आले. ते संध्याकाळपर्यंत शोध घेत होते. त्यानंतर संध्याकाळी त्यांनी संजय राऊत यांना आपल्यासोबत नेले. दरम्यान, रात्री १२ वाजून ४० मिनिटांनी त्यांना अटक केल्याची माहिती ईडीने दिली.
आज कोर्टात हजर केल्यावर ईडीने संजय राऊत यांना आठ दिवसांची ईडी कोठडी देण्याची मागणी केली होती. मात्र कोर्टाने त्यांना तीन दिवसांचीच कोठडी सुनावली आहे. आमचा न्यायालयावर विश्वास आहे. संजय राऊत यांनी कोणताही गुन्हा केलेला नाही. उद्धव ठाकरे यांना कमकुवत करण्यासाठीच संजय राऊत यांना अटक करण्यात आली आहे. आता न्यायव्यवस्था आपलं काम चोख करेल, संजय राऊतांना न्याय मिळेल, असा विश्वास सुनील राऊत यांनी व्यक्त केला.
दरम्यान, मुंबईतील १ हजार ०३४ कोटींच्या पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या घराची झाडाझडती घेतल्यानंतर सुरुवातीला ताब्यात घेऊन रविवारी रात्री उशीरा ईडीने अटक केली. त्यानंतर ईडीने संजय राऊत यांची न्यायालयाकडे ८ दिवसांच्या कोठडीची मागणी केली. मात्र संजय राऊत यांच्या वकिलांनी कोठडी द्यायची असेल तर आठ दिवसांपेक्षा कमी द्यावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर न्यायालयाने संजय राऊतांना ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. संजय राऊतांना अटक केल्यानंतर आज संजय राऊतांना सत्र न्यायालयात हजर केलं, कोर्ट रूम नंबर १६ मध्ये न्यायाधीश एम.जी. देशपांडे यांच्यासमोर ईडीनं रिमांडसाठी संजय राऊतांना हजर केलं. जेष्ठ वकील अशोक मुंदरगी यांनी संजय राऊतांच्या बाजूने युक्तिवाद केला. तर ईडीच्यावतीने हितेन वेणेगावकर यांच्याकडून युक्तिवाद करण्यात आला.