Join us

Sanjay Raut: संजय राऊतांनी आता शांत बसायचं ठरवलंय, ट्विट करुन स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 12:57 PM

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पाहून घेण्याची भाषा करतात. ही पाहून घेण्याची धमकी त्यांनी आम्हाला देऊ नये.

मुंबई - केंद्रीय तपास यंत्रणांकडून शिवसेना नेते आणि त्यांच्या नातेवाईकांवर होत असलेल्या कारवाईवरुन शिवसेना आणि भाजपात संघर्ष टोकाला गेला आहे. त्यातच, केंद्रीय यंत्रणांकडून होत असलेल्या कारवाईंवरुन शिवसेनेला प्रश्न विचारले जात आहेत. शिवसेना नेते आणि माजी स्थायी सभापती यशवंत जाधव यांच्या डायरीतील नोंदीवरूनही शिवसेना खासदार संजय राऊत यांना माध्यमांनी प्रश्न विचारले होते. त्यावर, संजय राऊत यांनी जैन डायरीचा उल्लेख करत उत्तरही दिलं. मात्र, आता राऊत यांनी केलेल्या ट्विटमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.  

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पाहून घेण्याची भाषा करतात. ही पाहून घेण्याची धमकी त्यांनी आम्हाला देऊ नये. ते खोटे पुरावे सादर करून खोट्या केस तयार करीत असल्याचे संजय राऊत यांनी यशवंत जाधव यांच्या डायरीसंदर्भात बोलताना म्हटले होते. विशेष म्हणजे महाविकास आघाडीच्या स्थापनेपूर्वीपासून संजय राऊत आक्रमक आणि बेधडक बोलताना दिसून आले आहेत. महाविकास आघाडीची बाजू मांडताना भाजप आणि केंद्र सरकारला त्यांनी नेहमीच टार्गेट केलंय. मात्र, आता त्यांनी मौन बागळल्याचं ट्विट केलं आहे.  कधी कधी मौन हेच सर्वात चांगल उत्तर असतं, असे ट्विट करत संजय राऊत यांनी यापुढे आपलं उत्तर हे मौन असणार असल्याचं सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे, दररोज मीडियासमोर येऊन आपली बाजू मांडणारे शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी मौन बाळगल्याने अनेकांना आश्चर्य वाटत आहे. 

मग जैन व बिर्ला डायरीही विश्वासार्ह मानावी

केंद्रीय तपास यंत्रणा कारवाई करीत असल्याचा संदर्भ देऊन खासदार राऊत म्हणाले होते की, जाधव यांची डायरी जर विश्वासार्ह असेल तर यापूर्वी आलेल्या जैन डायरी व बिर्ला डायरी सुद्धा विश्वासार्ह मानून त्यात नमूद असलेल्या नेत्यांवर कारवाई व्हायला पाहिजे. जैन डायरीच्या वेळी भाजपच्या नेत्यांची नावे उघड झाल्याबरोबर डायरीतील नोंदी विश्वासार्ह नसल्याचे सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात प्रतिपादन केले होते. एका डायरीला एक न्याय व दुसऱ्याला दुसरा न्याय, ही दुटप्पी भूमिका मान्य नाही.  

टॅग्स :शिवसेनासंजय राऊतभाजपाअंमलबजावणी संचालनालय