मुंबई - शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांचा न्यायालयीन कोठडीतील मुक्काम हा पाच सप्टेंबरपर्यंत वाढला आहे. ईडीच्या पीएमएलए कोर्टाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. दरम्यान, न्यायालयीन कोठडी वाढवण्यात आल्यानंतर संजय राऊत यांनी आक्रमक मत मांडलं आहे. संजय राऊत यांनी माझ्यावरील केस खोटी आहे, असं सांगितलं. तसेच सच के साथ लढा जा सकता है, झुठ के साथ नही, असं त्यांनी म्हटलं आहे. तसेच संजय राऊत हे न्यायालयीन कोठडीमध्ये एक पुस्तक लिहित असल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबईच्या गोरेगाव पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना आज पुन्हा एकदा ED च्या विशेष PMLA न्यायालयाने धक्का दिला आहे. आज कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता संजय राऊत यांना ५ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीतच ठेवण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, संजय राऊत हे जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज करण्याची शक्यता आहे. २५ किंवा २६ ऑगस्ट रोजी संजय राऊत हे जामिनासाठी अर्ज करतील.
पत्राचाळ पुनर्विकासात झालेल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत चांगलेच अडचणीत आले आहेत. काही दिवसांपूर्वी ईडीच्या अधिकाऱ्यांनी अचानक त्यांच्या भांडूप येथील घरी छापेमारी केली. त्यात ईडीच्या अधिकाऱ्यांना ११ लाख ५० हजार रुपयांची रोख रक्कम सापडली. याचसोबत काही कागदपत्रे अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतली होती. ते चौकशीत सहकार्य करत नसल्याचे सांगत सायंकाळी पावणेसहाच्या दरम्यान राऊत यांना ईडीने बॅलॉर्ड इस्टेट येथील कार्यालयात चौकशीसाठी आणले. रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरु होती. यानंतर त्यांना मध्यरात्री अटक करण्यात आली होती.