मुंबई - शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत उभी फूट पडल्याचं दिसून येत आहे. शिवसेनेचे तब्बल ३९ आमदार शिंदे गटात सहभागी झाले. त्यामुळे शिवसेनेत नाराजी उफाळून आल्याचं दिसून आले. आता या सर्व आमदारांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत. काही ठिकाणी बंडखोर आमदारांची कार्यालये फोडली जात आहेत. तर शिवसेनेचे नेते संजय राऊत सातत्याने बंडखोर आमदारांविरोधात आक्रमक टीका करत आहेत. त्यामुळेही, बंडखोर आमदार नाराज झाले आहेत. मात्र, शिवसेना भवनाबाहेर आल्यानंतर संजय राऊत माध्यमांना न बोलताच निघून गेले.
राज्यातील राजकीय घडामोडींवर नेहमीच भाष्य करणारे शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांना माध्यमांनी गराडा घातला होता. मात्र, माध्यमांशी न बोलताच ते निघून गेले. त्यामुळे, अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. विशेष म्हणजे आज सकाळीच संजय राऊत यांना ईडी कार्यालयाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. त्यावरही, त्यांनी ट्विटर आणि मीडियासमोर येऊन प्रतिक्रिया दिली होती. मात्र, शिवसेना भवन येथे ते दुपारी बैठकीसाठी गेले होते. या बैठकीनंतर माध्यमांनी त्यांना कोर्टासंदर्भातील घडामोडींवर आणि शिवसेनेच्या भूमिकेसंदर्भात प्रश्न विचारण्यासाठी माध्यमांनी त्यांना गराडा घातला होता. मात्र, ते माध्यमांशी न बोलताच निघून गेले. त्यामुळे, अनेकांना आश्चर्य वाटत आहे.
पत्राचाळ जमीनप्रकरणी ईडीची नोटीस
शिवसेनेचे नेते संजय राऊत (Shivsena Sanjay Raut) बंडखोर आमदारांवर सातत्याने निशाणा साधत आहेत. दरम्यान, आता संजय राऊत यांना ईडीने समन्स बजावलं आहे. राज्यात सत्तासंघर्ष पराकोटीला पोहोचला असताना राऊत यांना ईडीनं समन्स बजावलं आहे. पत्राचाळ जमीन खरेदी घोटाळा प्रकरणी त्यांना हे समन्स बजावण्यात आलंय. संजय राऊत यांना मंगळवारी चौकशीला हजर राहण्याचे आदेशही देण्यात आलेत. यानंतर आता यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मान कापली तरी गुवाहटीला जाणार नाही
"माझी मान कापली तरी मी गुवाहाटीचा मार्ग स्विकारणार नाही. या.. मला अटक करा!" असं म्हटलं आहे. संजय राऊत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "मला आताचा समजले ED ने मला समन्स पाठवले आहे. छान. महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी सुरू आहेत. आम्ही सगळे बाळासाहेबांचे शिवसैनिक मोठ्या लढाईत उतरलो आहोत. मला रोखण्यासाठी... हे कारस्थान सुरू आहे. माझी मान कापली तरी मी गुहातीचा मार्ग स्विकारणार नाही. या... मला अटक करा! जय महाराष्ट्र!" असं राऊत यांनी म्हटलं आहे.