Join us  

Sanjay Raut: आधी राजभवनात जा, चहा-बिस्किटं न खाता राज्यपालांना...; संजय राऊतांचा भाजपाला टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2022 11:09 AM

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानावरुन खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा निशाणा साधला.

मुंबई-

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानावरुन खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा निशाणा साधला. "राज्यपालांवर कारवाई करावीच लागेल. भाजपाचे मुंबई अध्यक्ष कर्नाटकच्या आरे ला कारे करु म्हणत आहेत. त्यांनी आधी राज्यपालांना जाऊन कारे करा. तुम्ही असं छत्रपती शिवाजी महाराजांबाबत कसं बोलू शकता याचा जाब त्यांना विचारा", असं संजय राऊत म्हणाले. 

"भाजपा नेत्यांपैकी रोज कुणीतरी उठतं आणि शिवरायांची बदनामी करतं. हे लोक फक्त लाचार आहेत आणि यांच्यात कुणाच्यातही हिंमत नाही. महाराजांच्या इतिहासाशी का खेळता? हिंमत असेल तर कर्नाटकला उत्तर द्या. भाजपा मुंबईचे नेते आशिष शेलार म्हणाले कर्नाटकच्या आरे ला आम्ही कारे करू, त्यांनी आधी राजभवनात जाऊन राज्यपालांना कारे करुन दाखवावं. राजभवनात जाऊन तिथली चहा-बिस्किटनं न खाता आधी शिवाजी महाराजांबद्दल कारे बदनामी करता असं भाजपा नेत्यांनी कोश्यारींना विचारावं. मग कर्नाटकला उत्तर देण्याची भाषा करावी", असं संजय राऊत म्हणाले. 

मशीनमध्ये गडबड करुन करुन किती गडबड करणार; गुजरात निवडणुकीवर संजय राऊतांचा गंभीर आरोप!

सीमावादाच्या मुद्दा तापलेला असल्यामुळे मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभुराजे देसाई यांचा बेळगाव दौरा रद्द होणार असल्याची चर्चा आहे. यावरही संजय राऊत यांनी निशाणा साधला. "चंद्रकांत पाटील आणि शंभूराजे देसाई यांनी हिंमत दाखवून कर्नाटकच्या सीमेला स्पर्श तरी करुन दाखवावा. ते कर्नाटकवाले महाराष्ट्रात घुसलेत तुम्ही कसल्या आरेला कारे करण्याच्या बाता करता", असं संजय राऊत म्हणाले. 

गुजरात निवडणुकीत मशीनमध्ये गडबडगुजरात विधानसभा निवडणुकीसाठीच्या दुसऱ्या टप्प्यासाठीचं मतदान आज होत आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज मतदानाचा हक्क बजावला. या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी भाजपा आणि मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे. भाजपानं खरंतर गुजरात निवडणूक कोणत्याही प्रचाराविना जिंकायला हवी. पण खुद्द पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना गुजरातमध्ये प्रचारासाठी ठाण मांडून बसावं लागलं आहे. त्यामुळे निकाल काय लागेल सांगू शकत नाही, असं संजय राऊत म्हणाले. तसंच मशीनमध्ये गडबड करुन करुन किती गडबड करणार, लोकांचा आता निवडणूक यंत्रणेवर विश्वास राहिलेला नाही, असं मोठं विधान संजय राऊत यांनी यावेळी केलं.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :संजय राऊत